महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापूरमध्ये आयटी पार्कच्या जागेचा प्रश्न, शेंडा पार्कमधील जागा पडतेय अपुरी!

कोल्हापूर(प्रतिनिधी): कोल्हापूरला आयटी हब बनवण्याचे स्वप्न गेली 12 वर्षे पाहिले जात आहे. यासाठी प्रशासनाकडून आयटी पार्कसाठी जागेचा शोध सुरू आहे. 2024 मध्ये शेंडा पार्कातील कृषी विभागाची 30 एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला, पण आता ती जागा अपुरी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योग विभागाने कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गालगत नवीन जागेचा शोध सुरू केला आहे.

पुणे आणि बंगळूर या दोन प्रमुख आयटी हब शहरांच्यामध्ये कोल्हापूर आहे. या शहरातून 350 हून अधिक आयटी कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमधून दरवर्षी 300 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या सॉफ्टवेअरची निर्यात होते. यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांचे लक्ष कोल्हापूरकडे वेधले गेले आहे. या कंपन्यांनी कोल्हापूरमध्ये येण्याची तयारी दर्शविली आहे, पण त्यांच्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. स्थानिक तरुणांना नोकरीसाठी शहराबाहेर जावे लागू नये, यासाठी कोल्हापूरमध्ये आयटी पार्कची मागणी अनेक वर्षांपासून आहे. अनेक ठिकाणी जागेचा शोध घेतल्यानंतर शेंडा पार्कातील कृषी विभागाची 30 एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आणि त्यासाठीची प्रक्रियाही सुरू झाली. मात्र, भविष्यात आयटी पार्कचा विस्तार करायचा झाल्यास ही जागा अपुरी पडेल, अशी भीती प्रशासनाला आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या कंपन्यांना जागा कशी उपलब्ध करून द्यायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता उद्योग विभागाने कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाजवळ पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे. योग्य जागा मिळाल्यास कोल्हापूरचा आयटी क्षेत्रातील विकास अधिक वेगाने होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button