हुपरीमध्ये नागरीक हक्क समितीचे वाढीव वीज बिलांविरोधात आंदोलन!

हुपरी (सलीम शेख) : वाढीव वीज बिलांच्या निषेधार्थ हुपरीतील ‘नागरीक हक्क संरक्षण समिती’ने आक्रमक भूमिका घेतली आहे. महावितरणच्या हुपरी येथील उपविभागीय कार्यालयासमोर बेकायदेशीर वाढीव बिलांची होळी करून समितीने आपला निषेध नोंदवला.
महावितरणकडून वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून (डिपॉझिट) थकीत बिलांची वसुली सुरू करण्यात आली आहे. तसेच, चालू बिलांमध्ये वाढीव डिपॉझिटची रक्कम जोडून बेकायदेशीर बिले ग्राहकांना पाठवली जात आहेत, असा आरोप समितीने केला आहे.

या निषेध आंदोलनानंतर समितीने निवेदनात म्हटले आहे की, थकीत बिलांच्या वसुलीसाठी ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. ग्राहकाच्या परवानगीशिवाय त्याच्या सुरक्षा ठेवीला हात लावणे म्हणजे ग्राहकांच्या पैशांवर दरोडा घालण्यासारखे आहे. महाराष्ट्र शासनाचा कोणताही आदेश नसताना कंपनीने स्वतःच्या अधिकारात हे बेकायदेशीर वसुली अभियान सुरू केले आहे, जे तात्काळ थांबवावे.

यासोबतच, चालू बिलांमध्ये जोडलेली वाढीव डिपॉझिट रक्कम तात्काळ कमी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा, पुढील सोमवारी ‘गनिमी काव्याने’ आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.
यावेळी समितीचे उपशहर प्रमुख सुहास माने, सचिव सूर्यकांत रावण, राजेंद्र उगळे, संजय पाटील, दादासो कामते, संदीप भंडारे, उमेश लोंढे, दगडू महाजन, ओंकार जांभळे, संतोष परीट, भरत देसाई, राजेंद्र संकपाळ, सचिन पाटील, अरुण गवळी, बापू जाधव, शिवाजी शिंदे, राहुल चव्हाण, अमर माळी, सागर चौगुले, सोमनाथ माळी, शकील नायकोडे, शिवाजी शिंदे, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.




