महाराष्ट्र ग्रामीण

रिपब्लिकन पक्षाचा निपाणी-फोंडा रस्त्यासाठी एल्गार; निकृष्ट कामामुळे प्रशासनावर तीव्र संताप, आंदोलनाचा इशारा!

मुरगूड (बाळासो कांबळे ): निपाणी ते फोंडा या रस्त्याच्या अत्यंत निकृष्ट कामामुळे संतप्त झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने या विरोधात एल्गार पुकारला आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांची भेट घेऊन तीव्र शब्दात आपला निषेध नोंदवला आहे. रस्ता दुरुस्त न झाल्यास लवकरच रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे. रिपब्लिकन पक्षाचे कोल्हापूर जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या रस्त्याची पाहणी केली. या शिष्टमंडळात पक्षाचे कागल तालुका माजी अध्यक्ष बाबासाहेब कागलकर, राधानगरी तालुका अध्यक्ष कुंडलिक कांबळे, सिकंदर जमादार (पापा), प्रदीप वर्णे, आणि सिकंदर जमादार यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने केलेल्या पाहणीत असे दिसून आले की, जितेंद्र सिंग या कंपनीने केलेले हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. या रस्त्यामुळे निपाणी ते राधानगरी हा २५ मिनिटांचा प्रवास १ तास २५ मिनिटांचा झाला आहे. संपूर्ण रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, गेल्या दोन-तीन वर्षांत या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकी आणि चारचाकी प्रवाशांचा बळी गेला आहे.

वारंवार या प्रश्नावर आवाज उठवूनही बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही, असा आरोप रिपब्लिकन पक्षाने केला आहे. लोकांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र संताप असून, “नारूचा रोगी कळवा, एक हजार मिळवा” अशाच प्रकारे ‘रस्ता शोधा आणि एक हजार मिळवा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास ठेकेदार कंपनीवर कारवाई करून, त्यांच्यावर जोडे मारो आंदोलन करण्याचा विचारही जनतेच्या मनात आहे, असे पक्षाने म्हटले आहे. या गंभीर परिस्थितीवर वेळीच लक्ष दिले नाही, तर राधानगरीतील लोक वैतागून ठेकेदार कंपनीची गाढवावरून धिंड काढतील, अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने राधानगरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. येत्या सोमवार किंवा मंगळवारी ठेकेदार कंपनी, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार आणि रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक घेऊन तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी त्यांनी केली.

या मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा सतीश माळगे यांनी दिला. याशिवाय, २०१७ पासून या रस्त्यावरील निकृष्ट कामामुळे ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करून, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष शेवटपर्यंत लढा देईल, असे माळगे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button