महाराष्ट्र ग्रामीण

भाजपने सर्वांनाच फसवले: प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप!

मुंबई ((को.टा. न्यूज़ नेटवर्क)): मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत काढलेला जीआर (शासन निर्णय) हा फसवा असून, भाजपने मराठा समाज, मनोज जरांगे पाटील आणि कुणबी समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सरकारचा ‘न सुटणारा प्रश्न’ सोडवल्याचा दावा फसवा

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “भाजपने असा गाजावाजा केला की, न सुटणारा प्रश्न आम्ही सोडवला आहे. पण, प्रत्यक्षात हा जीआर म्हणजे मराठा समाजाला फसवण्याचा डाव आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, मुंबई उच्च न्यायालयाने जगन्नाथ डी. होल विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकारच्या प्रकरणात सर्व मराठा समाजाला कुणबी म्हणता येणार नाही, असा निकाल दिला होता. असे असतानाही, सरकारने सर्वांना कुणबी संबोधण्यासाठी जीआर काढून मराठा समाजाला फसवत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे असेल तर त्यांचे ताट वेगळे असावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कुणबी नोंदी आणि न्या. शिंदे समितीवर प्रश्नचिन्ह

न्या. संदीप शिंदे समितीने ५८ लाख कुणबी नोंदी शोधल्याचा दावा केला होता. परंतु, या नोंदींवरून मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळणार नाही, असे आंबेडकरांनी सांगितले. कुणबी ही जात नसून, तो एक व्यवसाय असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने आधीच म्हटलं आहे, त्यामुळे या जीआरचा काहीही उपयोग होणार नाही. सरकारने मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेली शासकीय उपसमिती आणि न्या. शिंदे समितीने मराठा समाजाची दिशाभूल केली आहे, असेही ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील आणि कुणबी समाजाचीही फसवणूक

ॲड. आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली. “मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रावर आरक्षण मिळवून देण्याचा दावा केला, पण त्यांनाही सरकारने फसवले आहे. कारण, जीआरमध्ये सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूद नाही.” त्याचबरोबर, कुणबी समाजाचे आरक्षण धोक्यात आणण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे, असे सांगत त्यांनी कुणबी समाजाचीही फसवणूक झाल्याचा आरोप केला.

सरकारचा हेतू काय?

सरकारने हा जीआर राजकीय फायद्यासाठी काढल्याचा आरोपही ॲड. आंबेडकरांनी केला आहे. ते म्हणाले की, “या जीआरमुळे मराठा आणि ओबीसी समाजात फूट पडेल. सरकारला मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावून राजकारण करायचे आहे.” त्यांनी मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाला सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button