महाराष्ट्र ग्रामीण

निपाणी-फोंडा महामार्गावर निकृष्ट दर्जाचे काम; सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

मुरगूड (बाळासो कांबळे) : कागल – निपाणी-फोंडा महामार्गाच्या दुरवस्थेवरून सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू झाले. परंतु, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप मुरगूड येथील नागरिकांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी, जितेंद्र सिंग कंपनी यांच्याकडून पुन्हा एकदा निष्काळजीपणा होत असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता थेट न्यायालयीन कारवाईचा इशारा दिला आहे.

९ सप्टेंबर रोजी मुरगूड गेस्ट हाऊसमध्ये रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, जागृत मालक फाउंडेशन, पत्रकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि जितेंद्र सिंग कंपनीचे प्रतिनिधी यांची बैठक झाली होती. या बैठकीत खराब रस्त्याचा जाब विचारण्यात आला होता, ज्यानंतर ११ सप्टेंबरपासून खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, हे पॅचवर्क इतके हलक्या दर्जाचे आहे की काही ठिकाणी भरलेले खड्डे लगेचच निघून येत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

जेव्हा यासंदर्भात कंपनीच्या प्रतिनिधींना संपर्क साधला गेला, तेव्हा त्यांनी “आम्ही व्यवस्थित करून घेऊ” असे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनांवर विश्वास ठेवण्यास नागरिक तयार नाहीत. ज्या ठिकाणी पॅचवर्क केले जात आहे, तेथे खड्डे भरण्याऐवजी स्पीड ब्रेकर सारखे उंचवटे तयार होत आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना आणखी त्रास होत आहे.

या सर्व प्रकारात सार्वजनिक बांधकाम विभाग, राधानगरी यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांचा आरोप आहे की, विभागाचे अधिकारी केवळ पाहणीच्या फेऱ्या मारत आहेत, पण ठेकेदारावर कोणताही दबाव आणत नाहीत. यामुळे लोकांच्या हिताऐवजी स्वार्थाला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे दिसून येत आहे.

बैठकीत उप अभियंता इंगवले साहेब यांनी जितेंद्र सिंग कंपनीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. आता या आश्वासनाची पूर्तता होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जनतेला सुरक्षित रस्त्याचा हक्क मिळणार की नाही, हाच प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे. जर हीच परिस्थिती राहिली, तर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंपनीला न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button