अकलूजमधील १३ सराईत गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई!

सोलापूर (कोटा न्यूज नेटवर्क ) : अकलूजमधील सराईत गुन्हेगार लक्ष्मण बंदपट्टे आणि ज्ञानेश्वर काळे यांच्यासह त्यांच्या टोळीतील एकूण १३ गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) १९९९ नुसार कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने माळशिरस तालुक्यात संघटित गुन्हेगारीतून दहशत निर्माण केली होती.

गेल्या १० वर्षांपासून या टोळीतील सदस्यांनी घातक शस्त्रांचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणे, जबर दुखापत पोहोचवणे, दंगा करणे आणि धमक्या देणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. यापूर्वी, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ नुसार हद्दपारीसारखी प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती, मात्र त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही.

या टोळीने १४ जून २०२५ रोजी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, अकलूज पोलिसांनी या गुन्ह्यात मोक्का कायद्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, अतुल कुलकर्णी यांनी शिफारशीसह हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, सुनील फुलारी यांच्याकडे पाठवला होता.
या प्रस्तावाची पडताळणी करून सुनील फुलारी यांनी आरोपींवर मोक्का कलम लावण्यास मंजुरी दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, संतोष वाळके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
* लक्ष्मण बाबाजी बंदपट्टे
* बाजीराव हणमंत सरगर
* शंकर अशोक काळे
* ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक काळे
* राजू ज्ञानेश्वर काळे
* अर्जुन दत्ता चौगुले
* अतुल दत्तात्रय काळे
* आकाश रमेश धोत्रे
* बाळू भारत मदने
* रोहित मारुती काळे
* सलीम अब्दुल तांबोळी
* मनोज अशोक काळे
* किशोर राजेंद्र नवगन
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.




