ज्येष्ठ नागरिकांनी उर्वरित आयुष्य सुखासमाधानात, तणावमुक्त व्यतीत करावे – गजानन गंगापूरे!

मुरगूड (प्रतिनिधी-बाळासो कांबळे): मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन संघाच्या विरंगुळा केंद्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष गजानन गंगापूरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाची सुरुवात संघाचे सदस्य कृष्णा खाटांगळे व सुनंदा गुजर यांच्या दुःखद निधनाबद्दल दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संघाचे उपाध्यक्ष पी. डी. मगदूम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संघाच्या सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात झाली. जयवंत हावळ यांनी प्रास्ताविकात संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तसेच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. याप्रसंगी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असणाऱ्या १२ सदस्यांना गुलाब पुष्प आणि पेढा भरवून त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
संघाचा ‘वाचन कट्टा’ हा उपक्रम प्रत्येक रविवारी अव्याहतपणे सुरू असून, नुकताच या उपक्रमाने २५१ वा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. या महत्त्वपूर्ण यशाबद्दल संचालक जयवंत हावळ, रामचंद्र पाटील, मधुकर सामंत, सिकंदर जमादार, विनायक हावळ, आणि प्रदीप वर्णे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात गजानन गंगापूरे यांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व विशद केले. त्यांनी ज्येष्ठांच्या सद्यस्थितीचा, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार आणि अन्यायाचा संक्षिप्त आढावा घेतला. तसेच, ज्येष्ठांनी आपले उर्वरित आयुष्य सुखासमाधानात, आनंदात, आरोग्यदायी आणि तणावमुक्त व्यतीत करावे यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या प्रकृतीची काळजी कशी घ्यावी आणि कसे वागावे या सर्व बाबींवर त्यांनी उपस्थितांना मोलाचे सल्ले दिले.
यावेळी सत्कारमूर्ती पी. व्ही. पाटील, चंद्रकांत दरेकर, आणि महादेव साळोखे यांच्यातर्फे उपस्थितांना नाष्टा आणि चहापानाची व्यवस्था करण्यात आली. तसेच, सदस्य रमेश भोपळे आणि आनंदा चांदेकर यांनी संघासाठी देणगी स्वरूपात आर्थिक हातभार लावला. या कार्यक्रमाला सदाशिव एकल, महादेव वागवेकर, प्रा. चंद्रकांत जाधव, किशोर पाटील, गणपती शिरसेकर, सदाशिव यादव, दादू बरकाळे, लक्ष्मण गोधडे, रघुनाथ सुर्यवंशी, सुरेश दरेकर, बाजीराव खराडे, किरण गवाणकर, विलास सुर्यवंशी, मारुती रावण, दादोबा मडिलगेकर, रामचंद्र रणवरे, मारुती गोधडे, प्रकाश ढाणे यांच्यासह असंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक डवरी यांनी केले, तर शेवटी सचिव सखाराम सावर्डेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.



