भारतीय बौद्ध महासभा व लोक कल्याण समता प्रतिष्ठानतर्फे कागल तालुक्यात ‘धम्मचक्र प्रवर्तन व अशोक विजयादशमी’ उत्साहात संपन्न!

कागल (प्रतिनिधी : बाळासो कांबळे): भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर जिल्हा अंतर्गत कागल तालुक्याच्या वतीने आणि लोक कल्याण समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी सोहळा प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. धम्म, धम्माची गरज आणि त्याचे फायदे यावर झालेल्या प्रबोधनामुळे उपस्थितांचे मन मंत्रमुग्ध झाले. या मंगलमय कार्यक्रमाची सुरुवात सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. त्यानंतर उपस्थितांनी एकत्रितपणे पंचशील ग्रहण केले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व समाज भूषण पुरस्कार प्राप्त साताप्पा कांबळे यांनी केले. त्यांनी या दिवसाचे महत्त्व आणि धम्मकार्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. सामाजिक कार्यकर्ते व लोक कल्याण समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष एच. जी कांबळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक व महाराष्ट्र राज्य समन्वयक महेश धम्मरक्षित हे उपस्थित होते. मार्गदर्शन करताना त्यांनी अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तिहेरी स्वरूपावर प्रकाश टाकला. धम्मचक्राचे तीन टप्पे स्पष्ट करताना ते म्हणाले: १. पहिले धम्मचक्र: तथागत गौतम बुद्ध यांनी धम्म रुजविण्यास सुरुवात केली, तो पहिला धम्मचक्र प्रवर्तन दिन. २. दुसरे धम्मचक्र (अशोक विजयादशमी): तथागत बुद्धांचा काळ गेल्यानंतर महासम्राट अशोक राजाने कलिंग युद्धातील हिंसेनंतर बौद्ध धम्म स्वीकारून बुद्धांचा धम्म पुन्हा उजागर केला आणि तो जगातील विविध देशांमध्ये पोहोचवला. ३. तिसरे धम्मचक्र: हजारो वर्षांच्या गुलामगिरीचे बंधने तोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी सम्राट अशोकाच्या विजयादशमीचे औचित्य साधून तोच बुद्ध धम्म पुन्हा भारतात पूर्णजीवीत केला आणि भारतातील सर्व समाजाला दिला, हे तिसरे धम्मचक्र. धम्मरक्षित सरांनी हा विशेष गुण आपल्या धम्म बांधवांना कळावा आणि धम्माचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी अत्यंत सोप्या शब्दांत धम्म, धम्माची गरज, धम्माचे फायदे आणि स्वतःचे अनुभव याविषयी मार्गदर्शन करून उपस्थितांना विचारमग्न केले.
यावेळी प्रा. एल.व्ही. शर्मा सर, बी. एल. कांबळे, संजय कांबळे बोरवडेकर, संजय कांबळे सर सावर्डे, प्रा. अशोक कांबळे, राजेंद्र कांबळे मुरगुड आणि एच. जी. कांबळे आदी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या धम्म सोहळ्यासाठी भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर जिल्हा संघटक अनिल कांबळे, जिल्हा संरक्षण प्रमुख आर. आर. प्रधान, कागल तालुका उपाध्यक्ष निवास कांबळे, मा. सभापती सुभाष कांबळे, संघटक दत्ता कांबळे, शंकर कांबळे, नागेश कांबळे, सरदार कांबळे, दिलीप कापशीकर, मिथुन कांबळे, अनिल कांबळे आलाबाद, सुभाष कांबळे, सौरभ कांबळे, बाळासाहेब कांबळे, बी.एम.कांबळे, एकनाथ कांबळे, विठ्ठल कांबळे, दादासाहेब कांबळे, कवी बापूसाहेब दुकानदार, माजी सरपंच सिताराम कांबळे, गणपती माने, राहुल कांबळे, सुमित कांबळे, शिवाजी कांबळे, संग्राम कांबळे, अमित कांबळे, सौरभ कांबळे, नंदु तिराळे आदींसह मोठ्या संख्येने उपासक बौद्ध बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कागल तालुका अध्यक्ष हिरामणी कांबळे यांनी प्रभावीपणे केले, तर जिल्हा कोषाध्यक्ष दिलीप कांबळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित धम्म बांधवांना खिरदान वाटप करण्यात आले.




