सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरील हल्ल्याचा आर.पी.आय.कडून तीव्र निषेध; ‘लोकशाहीवरील हल्ला’ असल्याचे मत!

कोल्हापूर (सलीम शेख ): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (R.P.I.) ने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हा केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून, लोकशाही व्यवस्थेवर आणि न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर झालेला गंभीर हल्ला आहे, असे परखड मत पक्षाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
पक्षाने या घटनेला देशासाठी चिंतेचा विषय मानले असून, न्यायव्यवस्थेवर अशाप्रकारे वारंवार हल्ले होत असतील, तर ते एका व्यक्तीकरणाचा आणि लोकशाहीवरचा हल्ला असल्याचे नमूद केले आहे.
न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा आणि समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असे आर.पी.आय.चे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी झालेला हा प्रकार एक गंभीर षड्यंत्र असून, यामागे काही अज्ञात शक्ती कार्यरत असल्याची शंकाही पक्षाने व्यक्त केली आहे.
आर.पी.आय.ने राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की, या गुन्हेगारांचा कसून तपास करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. या हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेणे आणि त्यांना कायद्यासमोर उभे करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच आपल्या देशाची न्यायव्यवस्था टिकेल आणि सामान्य लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहील, असे पक्षाने म्हटले आहे.
पक्षप्रमुख बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असलेल्या या संघटनेने, समाज माध्यमांनी आणि सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणात संयमित व जबाबदार भूमिका घ्यावी, असे आवाहनही केले आहे.यावेळी बबनराव शिंदे रि.पा. ई. गवई पक्षाचे राज्य संघटक,संदिप हेर्लेकर जिल्हा सरचिटणीस,विनोद चव्हाण जिल्हा संघटक,
बाबासाहेब कांबळे जिल्हा संघटक,कोंडीबा कांबळे जिल्हा उपाध्यक्ष,महेश शिंदे तालुका संघटक,शोभा कुमठेकर जिल्हा उपाध्यक्षा,शामराव भोसले अपंग सेल जिल्हाध्यक्ष,महिपतराव यादव तालुका संघटक,मंगला वरपे जिल्हा संघटक यांनी जिल्हा कोल्हापूर कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देताना उपस्थित होते.




