महाराष्ट्र ग्रामीण

मुरगूडमधील मतदार यादीतील गंभीर त्रुटी; वगळलेल्या नावांवरून गदारोळ; तातडीने दुरुस्तीची मागणी!

मुरगूड:(प्रतिनिधी: बाळासो कांबळे)-मुरगूड नगर परिषदेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्व प्रभागांच्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक गंभीर चुका आणि त्रुटी आढळल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. काही मतदारांची नावे यादीतून गायब झाली आहेत, तर अनेकांची नावे दुबार झाल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर घोळाबाबत मुख्याधिकारी (Chief Officer) आणि बीएलओ (Booth Level Officer) यांनी त्वरित जबाबदारी घ्यावी, अशी मागणी नागरिक आणि माजी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

प्रारूप मतदार यादीतील चुकांबाबत हरकती नोंदवूनही मुख्याधिकारी यांनी त्या हरकतींवर टंगळामंगळ केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील तीन मतदारांवर हरकती घेण्यात आल्या होत्या. मात्र, मुख्याधिकारी यांनी आक्षेप घेणाऱ्यांना “तुम्ही बीएलओ यांना भेटा” असे सांगून जबाबदारी झटकल्याचे समोर आले आहे. याबाबत नागरिक अनिल अर्जुने यांनी दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी कागल तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भारतातील कोणत्याही व्यक्तीची दोन ठिकाणी मतदार नोंदणी असल्यास तो गंभीर गुन्हा असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदवण्याची सूचना केली. तसेच, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूची १६ नुसार, स्थानिक प्रशासन बीएलओ मार्फत संबंधित मतदारांना नोटीस देऊन अशी दुबार नावे कमी करू शकते, अशी माहिती दिली.

यावेळी अनिल अर्जुने यांनी दुबार मतदारांपैकी एकाची नोंदणी कर्नाटक येथील यमगर्णी गावातही असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. मात्र, मुरगूड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी (CEO) प्रारूप मतदार यादीत कोणताही बदल करता येत नसल्याचे उत्तर दिल्याचे अर्जुने यांनी सांगितले. कामचुकार बीएलओ यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कामचुकार बीएलओंसह मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत जबाबदारी घ्यावी आणि नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सदोष मतदार यादी तात्काळ दुरुस्त करून नवीन मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी आणि अनिल अर्जुने यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक अनंत फर्नांडिस, संग्राम साळोखे, नाना डवरी, तानाजी साळोखे आदी मान्यवर उपस्थित होते. मतदार यादीमध्ये दुबार नावे आढळत असल्याने, सर्व मतदारांचे मतदान ओळखपत्र त्वरित आधार कार्डला लिंक करावे, अशी प्रमुख मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button