वाघजाई डोंगरावरील वळणांवर खड्ड्यांचे साम्राज्य; वर्षभरात रस्ता खराब, दर्जावर प्रश्नचिन्ह!

कागल (प्रतिनिधी-बाळासो कांबळे): निढोरी ते कागल या महत्त्वाच्या मार्गावर अवघ्या वर्षभरापूर्वी डांबरीकरण पूर्ण होऊनही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. विशेषतः केनवडे गावापुढील वाघजाई डोंगरातून जाणाऱ्या वळणदार रस्त्यावर अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पडल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी याच परिसरात अपघात झाला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष कायम असल्याचे दिसून येत आहे.
निढोरी-कागल रस्त्याचे डांबरीकरण २०२४-२५ मध्ये पूर्ण झाले होते. मात्र, अवघ्या वर्षभरातच रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. रस्ते इतक्या लवकर खराब होण्याचे गूढ सुटत नसल्याचे नागरिक बोलत आहेत. कामासाठी वापरण्यात आलेल्या ‘मटेरियल’च्या दर्जावरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केनवडेच्या पुढे वाघजाई डोंगरावरील वळणांवर खड्डे अधिक धोकादायक ठरत आहेत. ज्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी होऊन छोटा हत्ती टेम्पोवर पडला होता आणि काही महिला जखमी झाल्या होत्या, त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. हे खड्डे अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. वर्षभरातच रस्ते खराब होण्यामागे ‘स्पेस टेक्नॉलॉजी’ (Space Technology) वापरली की काय? असा उपरोधिक सवाल नागरिक करत आहेत. कारण, “ज्या रस्त्यांमध्ये दोष आहेत, ते नक्कीच स्पेस टेक्नॉलॉजीने बनवले आहेत” अशी त्यांची भावना झाली आहे. यातून सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातील कामांच्या गुणवत्तेबद्दल जनतेत नाराजी असल्याचे स्पष्ट होते.
रस्त्याचे डांबरीकरण झाल्यावरही या मार्गावर वृक्षतोड व रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली विनादिक्कतपणे सुरू आहे. एक वर्षापूर्वी डांबरीकरण करतानाही वृक्षतोड झाली होती आणि २०२५ मध्येही ती सुरूच आहे. पर्यावरणाचा विचार न करता ही तोड सुरू असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, कागलच्या अधिकार्यांनी काम चालू असताना कोणत्या प्रतीचे मटेरियल वापरले आहे, याची तपासणी का केली नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विकासकामांमध्ये जनतेचा पैसा बांधकाम क्षेत्रात जास्त वापरला जात असल्याचे चित्र दिसत आहे. अधिकारी आणि ठेकेदार प्रामाणिकपणे काम करणार आहेत की नाही, हा जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे.
जनतेच्या पैशाचा योग्य वापर व्हावा आणि इथून पुढे तरी रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. तातडीने या धोकादायक खड्ड्यांची पाहणी करून ते भरण्यात यावेत, अन्यथा अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही.




