महाराष्ट्र ग्रामीण

राज ठाकरेंचा हल्लाबोल: उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सडकून टीका; शिवनेरीवर ‘नमो सेंटर’ उभारल्यास फोडून टाकू, असा इशारा

मुंबई(कोटा न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत पक्षाच्या एका महत्त्वाच्या मेळाव्यातून राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या मेळाव्यात त्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) बाबत शंका व्यक्त करत मतदारांच्या यादीतील घोळावरून १ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्याचे आवाहन केले. मात्र, सर्वाधिक लक्ष वेधले ते त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शिवरायांच्या गड किल्ल्यांवर ‘नमो टुरिझम सेंटर’ उभारण्याच्या निर्णयावर केलेल्या कठोर टीकेने.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकार (पर्यटन विभाग) शिवनेरी, रायगड, राजगडासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक स्थळांवर ‘नमो टुरिझम सेंटर्स’ उभारण्याची योजना आखत आहे आणि याबाबतचा शासन निर्णय (जीआर) देखील जारी झाला आहे. यावर राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “आपण आपला स्वाभिमान किती गहाण टाकायचा याला काही मर्यादा आहेत का? ह्यांच्या मनात हा विचार येतो कसा? हे एकनाथ शिंदे यांचं खातं आहे. काय करत आहेत हे ऐकाल तर नाही तुमची तळपायाची आग मस्तकात गेली तर सांगाल.” राज ठाकरे यांनी थेट इशारा दिला, “सत्ता असो नसो. वर नाही, खाली नाही, आजूबाजूला असो, कुठेही नाही. उभं केलं की फोडून टाकणार,” असा थेट इशारा त्यांनी दिला. महाराजांचे गडकिल्ले ही केवळ पर्यटन स्थळे नसून ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची प्रतीकं आहेत, तिथे ‘नमो’ नावाची केंद्रे उभी करणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्यासारखे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित लाचारीवरही टीका केली. ते म्हणाले, “मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं हे वरती पंतप्रधानांनादेखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे.” सत्ता डोक्यात गेल्यावर माणूस वाट्टेल ते करतो, मग ते शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असोत किंवा इतर काहीही असो. मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी ज्यांना खुश करता येईल त्यांना खुश केले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. “मुंबईतील जागा अडाणीला पाहिजेत? देऊन टाका. तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत. हे सगळं सत्तेतून. सत्ता येते ईव्हीएममधून,” असेही ते म्हणाले.

मेळाव्यात राज ठाकरे यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) च्या माध्यमातून मतचोरी कशी केली जाते आणि घोटाळा कसा होतो, याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावरून त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले. तसेच, मतदार याद्यांमधील मोठ्या प्रमाणावर असलेल्या गोंधळाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी, यातील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी मनसेकडून १ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button