महाराष्ट्र ग्रामीण

आमदार राजेश क्षीरसागर यांची नागाळा पार्क येथील रस्त्यांच्या कामाला अचानक भेट; दर्जेदार कामाच्या ठेकेदाराला सूचना

कोल्हापूर (सलीम शेख ) : शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवितास निर्माण झालेला धोका तसेच वाहनचालकांना होणारे मणक्याचे आणि कंबरेचे त्रास पाहता, आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने, आमदार क्षीरसागर यांनी आज नागाळा पार्क येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली.
शहरातील रस्ते खड्डेमय बनले असून रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. ही परिस्थिती सुधारून रस्ते दर्जेदार आणि टिकाऊ बनवण्यासाठी आमदार क्षीरसागर “ऑन फिल्ड” उतरले आहेत. नागाळा पार्क येथील पाहणीदरम्यान, त्यांनी रस्त्यांचा दर्जा आणि गुणवत्ता योग्य राखण्याबाबत संबंधित ठेकेदाराला कठोर सूचना दिल्या.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले की, कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले असावेत आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनासोबत वारंवार बैठका घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. दर्जेदार रस्ते करण्याची प्राथमिक जबाबदारी ठेकेदाराची आहे आणि त्यावर महानगरपालिकेचा अंकुश असणे अत्यंत आवश्यक आहे. कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असून, यात कोणतीही कसर राहणार नाही.
महानगरपालिकेची आर्थिक स्थिती आणि निधीची कमतरता लक्षात घेऊन, आमदार क्षीरसागर यांनी राज्य शासनाचा विशेष निधी, जिल्हा नियोजन समिती निधी आणि आमदार फंडातून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. निधी देत असताना विकास कामांचा दर्जा योग्य असणे गरजेचे आहे. नागरिकांकडून रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार येता कामा नये, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. येत्या काळात शहर खड्डेमुक्त करून नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्ते देण्यास आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button