महाराष्ट्र ग्रामीण

लखन बेनाडे खून प्रकरणातील आरोपीस राजारामपुरी पोलिसांकडून अटक!

राजारामपुरी (सलीम शेख) : कोल्हापूर येथील बहुचर्चित लखन आण्णाप्पा बेनाडे खून प्रकरणात गुन्हा घडल्यापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला राजारामपुरी पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आदर्श अरविंद शेंडेकर (वय २२, रा. योगेश्वरी कॉलनी, पाचगांव रोड, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दि. ०७.११.२०२५ रोजी रात्री ९.१० वाजता सापळा रचून ही कारवाई केली. लखन आण्णाप्पा बेनाडे (रा. रांगोळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्या खुनाप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. नीता उमाजी तडाखे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. हा क्रूर गुन्हा दि. १०.०७.२०२५ रोजी रात्री १०.०० वाजण्याच्या सुमारास सायबर चौक ते शाहू टोल नाका, कोल्हापूर या मार्गावर पाठलाग करून तसेच शाहू टोल नाका, प्रमोद कातकर यांच्या मालकीच्या जंगलातील जमीन, आणि पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हिरण्यकेशी नदी व यमगणी (वेदगंगा) नदीवरील पुलाखालील नदीपात्रात घडला होता. गुन्हा घडल्यापासून आरोपी आदर्श अरविंद शेंडेकर पोलिसांना गुंगारा देत होता.

आरोपी फरार असल्याने गुन्ह्याचा तपास थंडावला होता. मात्र, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार कृष्णात पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाहिजे असलेला आरोपी आदर्श शेंडेकर हा त्याच्या योगेश्वरी कॉलनी, पाचगाव रोड येथील घरी येणार आहे. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या सूचना व आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने तात्काळ कारवाईची योजना आखली. पथकाने आरोपीच्या घराभोवती सापळा रचला. आरोपी घरी येताच पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले आणि खुनाच्या गुन्ह्यात अटक केली.

पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धिरजकुमार बच्चु, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण कारवाई पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, रुपेश इंगळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक तानाजी चौगुले आणि पोलीस हवालदार कृष्णात पाटील, पोलीस कॉस्टेबल संदिप सावंत, विशाल शिरगांवकर, सुशांत तळप, सचिन पाटील, सत्यजीत सावंत, नितीश बागडी, अमोल पाटील यांचा समावेश असलेल्या पथकाने परिश्रम घेतले.

खुनाच्या या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण हे करीत आहेत. आरोपीला अटक झाल्यामुळे या खून प्रकरणातील अनेक अनुत्तरित प्रश्नांवर प्रकाश पडण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button