हिदायत नायकवडी यांना ‘राज्यस्तरीय समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित!

जयसिंगपूर (सलीम शेख ) : राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रात केलेल्या असामान्य आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल, तसेच कोरोना महामारीच्या कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता असंख्य गरजू रुग्णांची निस्वार्थ सेवा केल्याबद्दल, येथील हिदायत नायकवडी यांना नुकताच ‘पाचवा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या भरीव योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा गौरव समारंभ जयसिंगपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जयसिंगपूरचे प्रसिद्ध उद्योगपती विनोदभाऊ घोडावत, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने (बापु), जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, आणि उद्योगपती दिपक बियाणी या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हिदायत नायकवडी यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर हिदायत नायकवडी यांनी आपल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यातही समाजसेवा अविरतपणे सुरू ठेवण्याचा संकल्प बोलून दाखवला. त्यांच्या या बहुआयामी कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.




