भारतीय हॉकी शताब्दी महोत्सवानिमित्त कोल्हापुरात कनिष्ठस्तर हॉकी स्पर्धा उत्साहात संपन्न!

कोल्हापूर (सलीम शेख) : भारतीय हॉकी परंपरेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, ‘दि हॉकी कोल्हापूर’, ‘डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशन’ आणि जिल्ह्यातील सर्व हॉकी खेळाडूंच्या वतीने मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे मुला-मुलींच्या कनिष्ठस्तर हॉकी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते बक्षीस वितरण
या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाला. आमदार महाडिक यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी खेळाडूंनी अधिक परिश्रम घेण्याची गरज व्यक्त केली.
आमदार महाडिक पुढे म्हणाले, “केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ अभियानाच्या माध्यमातून आज नवनवीन खेळाडू घडत आहेत. खेड्यापाड्यांमध्ये लपलेल्या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. या सुवर्णसंधीचा जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी लाभ घ्यावा आणि कोल्हापूरचे नाव हॉकीच्या नकाशावर पुन्हा एकदा झळकावे,” असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
उपस्थितांची मांदियाळी
या समारंभाला राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक विजय साळोखे सरदार यांच्यासह अन्य मान्यवर, स्पर्धेतील खेळाडू, त्यांचे पालक आणि क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हॉकीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील युवा हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले आहे.




