कंपनीच्या अत्याचाराने तरुणाची आत्महत्या; ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी

कोल्हापूर (बाळासो कांबळे): विक्रम नगर येथील मेनन अँड मेनन कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कुमार आनंदा कांबळे (वय अंदाजे २६, रा. सांगरूळ, ता. करवीर) या तरुणाने कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चोरीचा खोटा आळ घेऊन कामावरून काढल्याने आलेल्या नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने आज, सोमवार दिनांक २४/११/२०२५ रोजी छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
कुमार कांबळे हा गेली सहा वर्षे मेनन अँड मेनन कंपनीत कंत्राटी मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. १० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १२ ते ८ च्या शिफ्टमध्ये त्याच्यावरती छोटा कीपॅडचा मोबाईल चोरल्याचा खोटा आळ घेण्यात आला. कंपनीचे सिक्युरिटी इन्चार्ज पार्ले, मेन कंत्राटदार अमर घाडगे, सुपरवायझर विकास डोंगळे आणि एचआर (HR) जयवंत कोडक यांनी मिळून जातीवादी द्वेषातून तसेच कुमारला कायम (पर्मनंट) करावे लागेल या भीतीपोटी त्याला लक्ष्य केले, असा पक्षाचा आरोप आहे. सिक्युरिटी इन्चार्ज पार्ले यांनी जबरदस्तीने कुमार कांबळेकडून एका लेटरवर सही घेऊन त्याला चोर ठरवले आणि त्याला विनाकारण कामावरून कमी केले. कामावरून कमी केल्यामुळे व चोरीचा आळ आल्यामुळे कुमार कांबळे नैराश्यात गेला. त्याचे लग्न होऊन केवळ एक वर्ष झाले होते आणि आई-वडील व भावाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. गेले दोन ते तीन महिने त्याने कंत्राटदार घाडगे आणि सुपरवायझर डोंगळे यांना फोन करून आपली बाजू समजावण्याचा प्रयत्न केला, ‘मी कोणतीही चोरी केली नाही’ असे वारंवार सांगितले, पण कोणीही त्याचे ऐकले नाही. शेवटी या अन्यायाला कंटाळून शुक्रवार दिनांक २१/११/२०२५ रोजी दुपारी दोन वाजता मयत कुमार कांबळे यांनी तन नाशक औषध (Poison) पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी तातडीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तीन दिवसांच्या उपचारानंतर अखेर आज, सोमवार दिनांक २४/११/२०२५ रोजी सकाळी ८:३० ते ९:०० वाजण्याच्या सुमारास कुमार कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही बातमी समजताच रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी कार्यकर्त्यांसह तत्काळ सीपीआरमध्ये धाव घेतली. कुंडलिक कांबळे, सरदार कांबळे, अजितकुमार सनदे, तानाजी भोसले, मनोज काळे, तसेच गिरीश कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर जबाबदार आरोपींना अटक करण्याची जोरदार मागणी करत आंदोलन केले. रिपब्लिकन पक्षाने कंपनीचे सिक्युरिटी इन्चार्ज पार्ले, सुपरवायझर विकास डोंगळे, मेन कंत्राटदार अमर घाडगे, आणि एचआर जयवंत कोडक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा (IPC 306) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, जातीवादी द्वेषातून हे कृत्य करण्यात आले असल्याने त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट (Atrocity Act) नुसार तातडीने गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी सतीश माळगे यांनी केली आहे. या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मृताचा देह (Body) स्वीकारणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. यामुळे सीपीआर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.




