कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: अफू आणि अंमली पदार्थांसह दोन आरोपी गजाआड!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार सो यांनी दिल्या होत्या. या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करत १ लाख ७६ हजार ३०६ रुपये किमतीचा अफू आणि अंमली पदार्थांसह दोन आरोपींना जेरबंद केले आहे. मा. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण यांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची माहिती काढण्यासाठी एक विशेष पथक तयार केले. या पथकात स.हा. पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि अंमलदार प्रवीण पाटील यांचा समावेश होता. या पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, दोन इसम अफू या अंमली पदार्थांची विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारावर, पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण यांनी तातडीने छापा कारवाईची सूचना दिली.
त्यानुसार, तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी जयसिंगपूर फाटा, राजमाता जिजाऊनगर गल्ली नं. १ मध्ये असलेल्या सी.सी.एस.आय. इमारतीचे टेरेसवरील खोलीमध्ये दिनांक ०१.१२.२०२५ रोजी सायंकाळी १५.२० वाजता छापा टाकला. या छाप्यात खालील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले: १. सुरेश हेंतराम बेनीवाल, वय २७, रा. राजस्थान धाबा अंबाव फाटा, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर २. धनराज शिवलाल मेघवाल, वय २५, रा. धनगर यादी भाट्याने आष्टा रोड पेठवडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
दोघेही मूळचे राजस्थानमधील असून, ते सध्या मूळ गाव लोलावास, ता. लोणी, जि. जोधपूर येथे राहत होते. खोलीची झडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून ९ कि.लो ५८७ ग्रॅम वजनाचा अफू अंमली पदार्थ आणि इतर साहित्य असा एकूण १,७६,३०६/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना ताब्यात घेण्यात आलेल्या अफूसह पुढील कायदेशीर कारवाईसाठी वडगाव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. धीरजकुमार सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, स.हा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महादेव क-हाळे, पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, विनोद कांबळे, संदीप पाटील, अरविंद पाटील, अशोक पोवार, संजय पडवळ आणि राजेश राठोड यांनी पार पाडली.




