कोल्हापूर MIDC केबल्सची चोरी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला ): कोल्हापूरच्या कागल पंचतारांकित एमआयडीसी (MIDC) परिसरात असलेल्या क्रोना स्टील डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून इलेक्ट्रिक केबल्सची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये सुमारे ₹४८,४००/- किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ०४:०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एमआयडीसीमधील प्लॉट नं. बी १३५, ९७, ७७ येथे असलेल्या क्रोना स्टील डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या फर्नेस एरियामध्ये ठेवलेले विविध प्रकारचे इलेक्ट्रिक केबल बंडल चोरीला गेले आहेत. फिर्यादी श्रीनिवास विष्णुगौडा पाटील, रा. अरळीकट्टी, पोस्ट लोकापुर, ता. मुधोळ, जि. बागलकोट, कर्नाटक यांनी या घटनेसंदर्भात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, कंपनीचे कच्चे लोखंड तयार करण्याचे काम चालते. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय व लबाडीच्या इराद्याने हे इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेले.
याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दि. ०३/१२/२०२५ रोजी रात्री ९.३७ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे मांडेकर हे तपास करत आहेत.




