मुरगूडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

मुरगूड (बाळासो कांबळे): विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर २०२५) मुरगूड शहरात त्यांना मोठ्या आदराने आणि उत्साहाने विनम्र अभिवादन करण्यात आले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आणि समाजवादी प्रबोधिनी मुरगूड येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात मोठ्या संख्येने नागरिक, बांधव आणि भगिनी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाखो अनुयायी मुंबई येथील चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे मुरगूडकरांनी बाबासाहेबांच्या विचारांना मनात साठवून त्यांच्या कार्यापासून ऊर्जा घेतली. यावेळी वक्त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या महान कार्याचा गौरव केला. बाबासाहेबांनी केवळ ५० वर्षांच्या अथक परिश्रमातून ५००० वर्षांची गुलामगिरी संपुष्टात आणली, हे विशेष नमूद करण्यात आले. कोणत्याही प्रकारची लढाई न करता किंवा जीवितहानी न होता, केवळ ‘पेन’ या शस्त्राचा वापर करून त्यांनी हजारो पिढ्यांना गुलामगिरीतून बाहेर काढले, असे यावेळी सांगितले गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला समता, बंधुता, न्याय आणि शिक्षण यांसारखे मूलभूत मंत्र दिले. त्यांचे प्रसिद्ध वचन “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले. बाबासाहेब हे अनेक पदव्या प्राप्त करणारे पहिले आणि कदाचित शेवटचे भारतीय आहेत, ज्यांच्या पदव्या क्रॉस करणारा विद्वान आजही जगात जन्माला आलेला नाही. त्यांनी भारताला अनमोल आणि सर्वश्रेष्ठ संविधान दिले, ज्याच्या बळावर आज देश प्रगती करत आहे. अशा या विश्वमानवास, परमपूज्य संघर्षनायकास उपस्थितांनी कोटी कोटी प्रणाम करत विनम्र अभिवादन केले. महामानवाला अभिवादन करण्यासाठी झालेल्या या कार्यक्रमास कॉ. बबन बारदेस्कर, भिकाजी कांबळे, मोहन कांबळे, माजी नगरसेवक अनिल कांबळे, दिलीप कांबळे, रमेश कांबळे, राहुल कांबळे, ओंकार कांबळे, अमर कांबळे, प्रवीण कांबळे, विजय कांबळे, विक्रम कांबळे, विशाल कांबळे, अमित भोसले इत्यादींसह अनेक बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




