वाघापूरचा ‘लॉन्ग मार्च’ नागपूरकडे रवाना: डॉ. आंबेडकरांच्या कमानीला विरोध, निष्क्रिय प्रशासनाविरोधात एल्गार!

भुदरगड (प्रतिनिधी: बाळासो कांबळे): वाघापूर (जि. कोल्हापूर) येथील बौद्ध बांधवांचा अनेक वर्षांपासून खितपत पडलेला प्रश्न अखेर महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे धडका देण्यासाठी ‘लॉन्ग मार्च’च्या स्वरूपात सुरू झाला आहे. निष्क्रिय आणि कथित दबावग्रस्त प्रशासनाचा जाहीर निषेध करत वाघापूरच्या दलित समाजाने आपल्या हक्कांसाठी संघर्षाची हाक दिली आहे. वाघापूर गावातील दलित समाजाच्या मालकीच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कमान उभारण्यास काही घटकांकडून विरोध होत आहे. हा प्रश्न २००४ पासून प्रलंबित असून तो अद्यापही सुटलेला नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सहा महिन्यांपूर्वी आपल्या समाजावर टाकण्यात आलेल्या सामाजिक बहिष्काराचा तीव्र निषेध केला. “जमीन आमची, निधी आमचा, तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमानीला विरोध का?” असा संतप्त सवाल आंदोलकांनी विचारला आहे. या संवेदनशील विषयावर गावचे सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार, प्रांत अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि जिल्हाधिकारी (Collector) यांपैकी कोणीही बोलण्यास किंवा न्याय देण्यास तयार नाही. “जनतेच्या करातून पगार घेणारे सरकारी नोकर (Government Servant) जर जनतेला न्याय देत नसतील, तर त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावे,” असा संताप वाघापूरच्या आंदोलकांनी प्रशासनावर व्यक्त केला आहे.
आंदोलनादरम्यान व्हणगुती (भुदरगड तालुका) येथे तहसीलदार अनिता देशमुख मॅडम यांना कोल्हापूर टाईम्स आणि लॉर्ड बुद्धचे पत्रकार यांनी वाघापूरच्या प्रश्नावर विचारणा केली असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. “हा जिल्हा प्रशासनाचा विषय आहे,” असे सांगून त्यांनी टाळाटाळ करत तातडीने गाडीतून निघून जाणे, हा प्रशासनावर असलेला दबाव स्पष्टपणे दर्शवतो, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. आंदोलकांनी यावेळी आमदार प्रकाश आबिटकर (भुदरगड) आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या कार्यशैलीवर थेट आणि गंभीर आरोप केला आहे. “तहसीलदार, प्रांत, सीओ, कलेक्टर हे अधिकारी आमदार आणि पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करताना दिसत आहेत. आमची मते फक्त पाहिजेत का? पालकमंत्री हे जनतेचे सेवक असतात, कोणा एका समाजाचे मक्तेदार नाहीत,” असे ठणकावून सांगत प्रशासनाला तुकाराम मुंढे साहेबांसारखे काम करण्याचा सल्ला देण्यात आला.
“आम्ही प्रशासनाकडे भीक मागत नाही. आमच्या हक्काचे आहे ते आम्ही मिळवणारच, जीव गेला तरी चालेल, पण माघार घेणार नाही. तुम्हाला जनतेला न्याय देता येत नसेल तर धुणी-भांडी करत बसा,” अशा कठोर शब्दांत प्रशासनावर टीका करण्यात आली.
या महामोर्चात मुरगूड, सोनाळी, गारगोटी, सरवडे, राशीवडे, राधानगरी, मुगळी, साके, आकुर्डे, निढोरी, बिद्री, कुरुकली, भोगावती, कोल्हापूर तसेच अनेक ठिकाणचे बौद्ध बांधव, चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेडग गावातील कमानीचा विषय यशस्वीपणे हाताळणारे नेते महेश कांबळे यांनी या लॉन्ग मार्चला उपस्थिती दर्शवत मार्गदर्शन केले. “जर दोन दिवसात वाघापूरच्या जनतेला न्याय मिळाला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र गोळा करण्याची धमक आमच्यामध्ये आहे,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
या महामोर्चाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) चे नेते पी.एस. कांबळे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले पक्ष) च्या वतीने शहाजी कांबळे, बेडगचे महेश कांबळे, ब्राइट आर्मीचे सदस्य, इतर विविध पक्ष आणि संघटना यांनी पाठिंबा दिला आंदोलक ‘या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे, तुफानातील दिवे आम्ही’ हे भीमगीत गात नागपूरच्या दिशेने पुढे कूच करत आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही अस्तित्वाची लढाई सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला आणि जिल्ह्यातील जबाबदार मंत्र्यांना लवकर सुबुद्धी सुचावी, अशी सदिच्छा आंदोलकांनी व्यक्त केली आहे.




