मालेफाटा अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू; गुन्हा नोंदवण्यात झालेल्या विलंबावरून संताप!

मालेफाटा (कोटा न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावरील मालेफाटा परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात २२ वर्षीय होतकरू विद्यार्थिनी दिव्या भोसले हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालवाहतूक टेम्पोला जोरदार धडक दिल्यानंतर हा अपघात झाला. ही धडक इतकी जबरदस्त होती की, कार तीन वेळा उलटून रस्त्यावर फरफटत गेली, ज्यामुळे परिसरामध्ये थरार निर्माण झाला. या अपघातात दिव्याची मैत्रीण देविका भुते आणि कार चालक गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवरही कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत.
दिव्या भोसले आणि देविका भुते या दोघीही अतिग्रे येथे होणाऱ्या एम.सी.ए. (MCA) परीक्षेसाठी कोल्हापूरहून एकाच कारमधून निघाल्या होत्या. मात्र, मालेफाटा येथे झालेल्या या अपघाताने त्यांच्या आयुष्यावर मोठा आघात केला. अपघातानंतर तिघांनाही तातडीने उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच दिव्याचा मृत्यू झाला. दिव्याच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे या दुर्दैवी घटनेला आणखी एक भावनिक किनार आहे. दिव्या आणि देविका या दोघी एकत्र राहत होत्या. विशेष म्हणजे, अपघात झाला तो सोमवार देविकाचा वाढदिवस होता. परीक्षा संपल्यानंतर दोघी मिळून वाढदिवस आनंदात साजरा करण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, नियतीने त्यांच्या आनंदी क्षणांवर क्रूरपणे काळ फिरवला. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात केलेल्या विलंबामुळे दिव्याच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पोलिस प्रशासनाची एकच धावपळ उडाली. यावेळी, कार चालकाने गुन्हा नोंद होऊ नये यासाठी दबाव टाकल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच गाजत आहे. नातेवाईकांच्या ठाम भूमिकेनंतर अखेरीस गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दिव्या भोसले हिच्या निधनाने एका हुशार विद्यार्थिनीला अकाली जीव गमवावा लागल्यामुळे शिक्षण क्षेत्रात आणि तिच्या मित्र-परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.




