सीपीआरमधील भ्रष्टाचारावर कडक कारवाई करा: शिवसेना (ठाकरे गट) कडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापुरातील सीपीआर (छत्रपती प्रमिलाराजे) रुग्णालयात उघडकीस आलेल्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी दोषींवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सादर करण्यात आले.
शिवसेना ठाकरे गटाने ८ डिसेंबर रोजी सीपीआर रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात स्टिंग ऑपरेशन केले होते. यावेळी त्यांना आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या नोंदी असलेली एक महत्त्वपूर्ण फाईल सापडली होती. याची दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती.
याच पार्श्वभूमीवर, आज शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात जोरदार मागणी केली की, या फाईलमधील गैरव्यवहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी. तसेच, ज्यांच्या कार्यकाळात हा भ्रष्टाचार झाला आहे, त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी.
निवेदनात प्रामुख्याने, सीपीआर रुग्णालयात आढळलेल्या ‘फाईल नंबर तीन’ ची चौकशी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा सरकारी वकील यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती नेमावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्या कार्यकाळात हा भ्रष्टाचार झाला असून, त्यांच्या कार्यकाळातील सर्व व्यवहारांची चौकशी एसीबीमार्फत करून त्यांच्या मालमत्तेचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, विराज पाटील, अवधूत साळोखे, मंजित माने, संतोष रेडेकर, संजय जाधव, प्रतिज्ञा उत्तुरे, रीमा देशपांडे, पूनम फडतरे, अभिजीत बुकशेट, तृप्ती जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


