नेर्लीतील गुरुदत्ता फाउंड्रीजजवळ भीषण अपघात! सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला ): नेर्ली येथील गुरुदत्ता फाउंड्रीसमोर दुपारी झालेल्या भीषण अपघातात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या कोल्हापूर उपक्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी सिद्धार्थ सिंह यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने प्रशासन व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, कामानिमित्त दुचाकीवरून तामगावकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला (क्र. MP28 ME 8366) मागून भरधाव डंपर ट्रक (क्र. MH 07 C 6125) ने जोरदार धडक दिली. या धडकेत मागील सीटवर बसलेले अधिकारी गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडले, तर दुचाकी चालकाला किरकोळ दुखापत झाली.
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. तक्रारीनुसार, ट्रकचालकाने वाहन निष्काळजीपणे व वेगमर्यादा न पाळता चालवले होते. तसेच अपघातानंतर कोणतीही मदत न पुरविता पळ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. गोकुळ शिरगाव पोलिसांनी संबंधित ट्रकचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे अंमलदार करत आहे.




