पेठवडगावमध्ये स्ट्रॉंग रूम वाद, खाजगी सीसीटीव्ही हटवल्याने तणाव!

पेठवडगाव (कोटा न्यूज नेटवर्क) : पेठवडगाव नगरपरिषद निवडणुकीत गुरुवारी स्ट्रॉंग रूमबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले. मराठा मंडळाच्या इमारतीत स्ट्रॉंग रूम ठेवण्यात आले असून इमारतीच्या आत निवडणूक आयोगाचे सीसीटीव्ही बसवले आहेत. मात्र बाहेर स्क्रीन बसवलेली नसल्याने काही कार्यकर्त्यांनी खाजगी घरांवर नवे सीसीटीव्ही बसवले होते. या कॅमेर्यांवर आयोगाने आक्षेप घेत प्रशासनाने ते हटवले.
कॅमेरे हटवताच यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यांनी ही कारवाई संशयास्पद असल्याचे सांगत स्ट्रॉंग रूम प्रक्रिया अपारदर्शक असल्याचा आरोप केला. तसेच स्ट्रॉंग रूमबाहेर स्क्रीन बसवण्याची मागणी केली. मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी परिस्थिती स्पष्ट करत सांगितले की, “खाजगी कॅमेरे आयोगाच्या कामात अडथळा आणतात. उमेदवारांना २४ तास स्ट्रॉंग रूम पाहणीचा अधिकार आहे.” त्यांच्या स्पष्टीकरणानंतर तणाव काहीसा कमी झाला. यादव आघाडीचे उमेदवार संदीप पाटील यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, “आम्हाला आयोगाकडून कोणतीही सूचना मिळाली नाही. स्ट्रॉंग रूमबाहेर स्क्रीन लावावी ही आमची मागणी आहे.”
या घटनेमुळे पेठवडगाव नगरपरिषद निवडणुकीत तणावाचे सावट कायम राहिले आहे.




