कणेरी ग्रामपंचायतीतर्फे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याची मागणी!

कणेरी (सलीम शेख ) : करवीर तालुक्यातील कणेरी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी/लोकनियुक्त सरपंच यांच्याकडे करण्यात आली आहे. कणेरी ग्रामपंचायत सदस्य गिरीश संभाजी बुजरे आणि नारायण आत्माराम पाटील यांनी यासंदर्भात दिनांक १०/१२/२०२५ रोजी निवेदन सादर केले आहे.
निवेदनानुसार, कणेरी ग्रामपंचायतीमार्फत वसूल केल्या जाणाऱ्या निवासी मालमत्ता कर आणि अन्य करांच्या थकबाकीच्या वसुलीमध्ये नागरिकांना ४०% सवलत/प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या योजनेचा उद्देश गावातील थकबाकीदार नागरिकांना दिलासा देऊन त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देणे आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभा घेऊन योजनेची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. थकबाकीदार घरफाळा (मालमत्ता कर), पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर यामध्ये ४०% सवलत भरणा करण्यास मिळावी. जे नागरिक थकबाकीदार आहेत, त्यांना या ४०% सवलतीमुळे कर भरण्यास प्रोत्साहन मिळेल आणि ते शासनाच्या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या अभियानामुळे थकबाकी जलद गतीने वसूल होऊन कणेरी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातदेखील लक्षणीय वाढ होईल.निवेदनात, ‘या अभियानाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी,’ अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.




