महाराष्ट्र ग्रामीण

गोकुळ शिरगाव येथे ‘श्रीकृष्ण यात्रे’ निमित्त २१ डिसेंबरला रंगणार भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार

गोकुळ शिरगाव: कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव येथे श्रीकृष्ण यात्रेनिमित्त रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतींमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील नामांकित बैलगाडा शौकीन सहभागी होणार असून, विविध गटांतून लाखो रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

या स्पर्धेचे नियोजन विविध चार गटांत करण्यात आले आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकांच्या गाड्यांना आकर्षक रोख रक्कमेने सन्मानित करण्यात येईल.

गट प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक
जनरल ‘अ’ गट ₹ ३१,०००/- ₹ २१,०००/- ₹ १५,०००/-
जनरल ‘ब’ गट ₹ २१,०००/- ₹ १५,०००/- ₹ ११,०००/-
दुस्सा चौसा गट ₹ १५,०००/- ₹ १०,०००/- ₹ ७,०००/-
जनरल आदत गट ₹ १०,०००/- ₹ ७,०००/- ₹ ५,०००/-

स्पर्धा पारदर्शक आणि शिस्तबद्ध व्हावी यासाठी आयोजकांनी कडक नियमावली जाहीर केली आहे:

  • शर्यतीदरम्यान बॅटरी, काठी किंवा बैलांना ढकलण्यास (पुशिंग) सक्त मनाई आहे. अशा प्रकारचा प्रकार आढळल्यास संबंधित गाडी बाद करण्यात येईल.

  • गाडीची नोंदणी करताना मालकाचे आधार कार्ड आणि बैलाचे फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे.

  • प्रत्येक गटात शर्यत होण्यासाठी किमान ७ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे.

  • शर्यतीमधील पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि तो सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.

  • मैदान धावण्यासाठी पूर्णपणे रास्त आणि सुरक्षित असेल, याची ग्वाही आयोजकांनी दिली आहे.

या थरारक शर्यती गोकुळ शिरगाव पाझर तलाव, छत्रपती शाहू महाराज नगर, गोकुळ शिरगाव येथील विस्तीर्ण मैदानात रंगणार आहेत. .

या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे तसेच कर्नाटक सीमेवरील नामवंत बैलगाडा मालक आपले ‘सर्जा-राजा’ घेऊन उतरणार आहेत. मैदानाची मशागत पूर्ण झाली असून, वळणावळणाच्या या घाटात बैलांचा वेग आणि चालकाचे कसब यांचा कस लागणार आहे. “गोकुळ शिरगावची बैलगाडा परंपरा ही अनेक वर्षांची आहे. ग्रामीण संस्कृती जोपासण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्साहासाठी आम्ही हे नियोजन केले आहे. बैलगाडा प्रेमींनी आणि मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यात्रेची शोभा वाढवावी, सर्व  शौकिनांनी शिस्त पाळून या शर्यतीचा आनंद घ्यावा.असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे” — आयोजक समिती, श्रीकृष्ण यात्रा कमिटी, गोकुळ शिरगाव. या भव्य शर्यतीमुळे गोकुळ शिरगाव परिसरात आतापासूनच उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, २१ डिसेंबरला मैदानावर कोणता ‘बकासूर’ किंवा ‘मथुर’ बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button