महाराष्ट्र ग्रामीण

‘कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!’ : कोल्हापूरच्या विकासासाठी काँग्रेसचा ‘जन-जाहीरनामा’ उपक्रम सुरू!

कोल्हापूर | मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षाने अत्यंत कल्पक आणि लोकशाहीभिमुख पाऊल उचलले आहे. शहराच्या विकासाचा आराखडा आता बंद खोलीत एसीमध्ये बसून नव्हे, तर थेट जनतेच्या दरबारात ठरणार आहे. याच उद्देशाने “कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!” या विशेष उपक्रमाचा आणि टॅगलाईनचा अधिकृत शुभारंभ आज कोल्हापूर काँग्रेस कमिटी येथे करण्यात आला.

याप्रसंगी आदरणीय खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी आमदार ऋतुराज संजय पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, “कोल्हापूरचे भविष्य काय असावे, हे ठरवण्याचा अधिकार केवळ राजकीय नेत्यांना नसून तो प्रत्येक कोल्हापूरकराचा आहे. म्हणूनच आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांच्या ज्या काही अपेक्षा, सूचना आणि संकल्पना असतील, त्या थेट स्वीकारून त्यावर आधारित काँग्रेस पक्षाचा महानगरपालिकेचा जाहीरनामा तयार केला जाईल.” खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “लोकाभिमुख विकास हीच कोल्हापूरची परंपरा आहे. जनतेच्या मनातील कोल्हापूर घडवण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.”

या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिक रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि पर्यटन यांसारख्या विविध विषयांवर आपल्या सूचना मांडू शकणार आहेत. या सूचनांसाठी लवकरच डिजिटल व्यासपीठ आणि संपर्क क्रमांकही कार्यान्वित केले जाणार आहेत. ‘जनतेचा जाहीरनामा’ (People’s Manifesto) ही संकल्पना राबवणारा काँग्रेस हा कोल्हापुरातील पहिलाच पक्ष ठरला आहे.

या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने: शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, आनंद माने, एड. तौफिक मुल्लाणी, दौलत देसाई, राहुल माने, भारतीताई पवार, सरलाताई पाटील, इंद्रजीत बोंद्रे,  बाळासाहेब सरनाईक, दुर्वासबापू कदम, संजय मोहीते, प्रतापसिंह जाधव, अमर समर्थ, शिवानंद बनछोडे, मोहन सालपे, भरत रसाळे, बयाजी शेळके, अनुप पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, “आमचं ठरलंय” नंतर आता काँग्रेसची ही नवीन टॅगलाईन मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button