अजितदादांच्या बालेकिल्ल्याला खिंडार! वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय संघमित्रा चौधरींची थेट निवडणुकीत एन्ट्री आणि ऐतिहासिक विजय!

बारामती (कोटा न्यूज नेटवर्क ): राजकारणाचे केंद्रस्थान आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अभेद्य बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीत एका २२ वर्षीय तरुणीने परिवर्तनाचा झेंडा फडकवला आहे. वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या संघमित्रा काळूराम चौधरी यांनी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरून प्रस्थापित राजकारण्यांना धूळ चारली आहे. बहुजन समाज पक्षाच्या (BSP) तिकिटावर निवडणूक लढवत त्यांनी मिळवलेला हा विजय सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे.
संघमित्रा या कायद्याचे (Law) शिक्षण घेत आहेत. वकिलीच्या अभ्यासात व्यस्त असतानाच त्यांनी जनसेवेसाठी राजकारणात पाऊल ठेवले. त्या बसपाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांच्या कन्या आहेत. वडिलांचा राजकीय वारसा असला तरी, बारामतीसारख्या ठिकाणी निवडणूक जिंकणे हे मोठे आव्हान होते. या विजयामुळे संघमित्रा या बारामती नगरपरिषदेच्या सर्वात तरुण नगरसेविका ठरल्या आहेत. बारामती म्हणजे पवार कुटुंबाचे वर्चस्व असलेले ठिकाण. येथे इतर पक्षांना संधी मिळणे कठीण मानले जाते. मात्र, संघमित्रा चौधरी यांनी हे समीकरण मोडीत काढले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना हरवून त्यांनी ही जागा खेचून आणली. “केवळ घराणी नव्हे तर सर्वसामान्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत,” हा विचार घेऊन त्या मतदारांपुढे गेल्या. वयाने लहान असूनही त्यांनी मांडलेली भूमिका आणि कायद्याचा अभ्यास यामुळे तरुण मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला.
निकाल जाहीर होताच संघमित्रा यांच्या विजयाची बातमी समजताच त्यांचे वडील काळूराम चौधरी भावूक झाले. अनेक वर्षांपासून बारामतीत बसपासाठी संघर्ष करणाऱ्या वडिलांच्या कष्टाचे फळ मुलीने विजयाने दिले, अशी भावना समर्थकांनी व्यक्त केली. “माझ्या लेकीने बालेकिल्ल्यात इतिहास रचला,” असे म्हणत त्यांनी मुलीचे अभिनंदन केले.
“मी कायद्याची विद्यार्थिनी आहे. कायद्याचे ज्ञान आणि लोकशाहीची ताकद काय असते, हे मला लोकांना दाखवायचे होते. बारामतीतील जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला मी तडा जाऊ देणार नाही. वकिलीचे शिक्षण घेतानाच मी सर्वसामान्यांचे वकील म्हणून सभागृहात प्रश्न मांडणार आहे.” – संघमित्रा चौधरी
हा विजय केवळ एका जागेचा नसून, बारामतीसारख्या ठिकाणी बदलाचे वारे वाहत असल्याचे संकेत आहेत. सुशिक्षित आणि तरुण पिढी राजकारणात येत असेल, तर ते लोकशाहीसाठी आशादायक चित्र आहे. बसपाने बारामतीत खाते उघडल्याने आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वकिलीच्या पुस्तकांमधून थेट निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या संघमित्रा चौधरी यांनी “जिद्द आणि अभ्यासू वृत्ती” असेल तर कोणत्याही बालेकिल्ल्याला खिंडार पाडता येते, हे सिद्ध करून दाखवले आहे.




