पुणे मनपासाठी अजित पवारांची मोठी खेळी; सतेज पाटलांना फोन करून दिली ‘एकत्र’ लढण्याची ऑफर!

पुणे/कोल्हापूर: राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारल्यानंतर आता राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. पुण्यातील आपले वर्चस्व टिकवण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता थेट काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना फोन केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी सतेज पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी अजितदादांनी त्यांना थेट ऑफर दिली की, “भाजपला रोखण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, तुम्ही सोबत या आपण एकत्रितपणे निवडणूक लढवू.” भाजपने निवडणुकीत दिलेल्या दणक्यानंतर अजित पवार सावध झाले असून, पुण्यातील सत्ता राखण्यासाठी ते आता नव्या मित्रपक्षांच्या शोधात असल्याचे दिसत आहे.
या फोन कॉलबाबत सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले: “हो, अजित पवार यांचा मला फोन आला होता ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकी संदर्भात एकत्रित लढण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, ही चर्चा केवळ पुण्यापुरती मर्यादित होती. कोल्हापूर महानगरपालिकेत आम्ही महाविकास आघाडी (MVA) म्हणूनच ठाम आहोत आणि तिथे राष्ट्रवादीशी (अजित पवार गट) युतीचा कोणताही प्रश्न येत नाही.”
विधानसभा आणि स्थानिक निकालांनंतर भाजपने वाढवलेला प्रभाव पाहता, अजित पवार गट पुण्यातील आपली ताकद वाढवण्यासाठी काँग्रेसशी ‘हातमिळवणी’ करण्याच्या तयारीत आहे. पुण्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यास भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. सतेज पाटलांनी कोल्हापुरात अजित पवार यांच्या पक्षासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला असून तिथे काँग्रेस-ठाकरे गट एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवारांच्या या एका फोनमुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही ठिकाणी अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. जर पुण्यात काँग्रेस आणि अजित पवार एकत्र आले, तर भाजपची रणनीती काय असेल आणि महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष (शरद पवार गट आणि ठाकरे गट) यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




