महाराष्ट्र ग्रामीण

भीषण अपघात: कोल्हापूरच्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारला कर्नाटकच्या चित्रदुर्गजवळ धडक; दोघांचा मृत्यू!

चित्रदुर्ग (कर्नाटक): कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस उपाधीक्षक (DYSP) वैष्णवी पाटील यांच्या कुटुंबावर रविवारी (११ जानेवारी २०२६) पहाटे काळाने झडप घातली. बंगळुरूहून कोल्हापूरकडे परतत असताना त्यांच्या इनोव्हा कारने महामार्गावरील एका ट्रकला (लॉरीला) मागून जोरात धडक दिली. या अपघातात वैष्णवी पाटील यांच्या आई आणि त्यांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी पाटील या आपल्या कुटुंबासह तामिळनाडूतील रामेश्वरम येथे एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. प्रवास संपवून बंगळुरूमार्गे कोल्हापूरला परत येत असताना चित्रदुर्ग जिल्ह्यातील तमटकल्लू गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. पहाटेच्या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा डुलकी लागल्याने गाडी समोर असलेल्या एका मल्टी-अॅक्सल ट्रकला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, इनोव्हा कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

मृत व्यक्ती: 1. कमला हरीबाबू पाटील (वय ६९): वैष्णवी पाटील यांच्या आई. 2. राकेश अर्जुन ऐवाळे (वय ३९): कार चालक (निपाणी येथील रहिवासी). जखमी: 1. वैष्णवी पाटील (वय ४५): पोलीस उपाधीक्षक, कोल्हापूर ACB. 2. कुसुम प्रल्हाद पाटील (वय ५७): वैष्णवी पाटील यांची मावशी. 3. उदय दत्तात्रय पाटील (वय ३८): पोलीस कॉन्स्टेबल.

अपघाताची माहिती मिळताच चित्रदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने चित्रदुर्ग येथील बसवेश्वर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्या धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, मात्र त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलात आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस अधिक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चित्रदुर्गकडे धाव घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button