महाराष्ट्र ग्रामीण

मुरगूड हादरले! अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाचा अत्याचार; नराधमावर कठोर कारवाईसाठी जनक्षोभ!

मुरगूड (प्रतिनिधी, बाळासो कांबळे): शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद घटना मुरगूड परिसरात उघडकीस आली आहे. चिमगाव येथील एका नामांकित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्याच १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कागल तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपी मुख्याध्यापकाला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी मुरगूडवासीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा ज्ञानू दाभोळे (वय ५५, रा. सावर्डेकर कॉलनी, मुरगूड) असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. पीडित मुलगी ही याच आश्रमशाळेत शिक्षण घेत होती. दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या या १६ वर्षीय गरीब विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने आपल्या पदाचा गैरवापर करत वेळोवेळी बलात्कार केला. तसेच, ही घटना कोणाला सांगितल्यास ‘जीवे मारण्याची धमकी’ देऊन तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून आईने तत्काळ मुलीला घेऊन कोल्हापूर गाठले आणि पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केला. महिला सहाय्य कक्षात पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर, जुना राजवाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत नराधम मुख्याध्यापकावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मुरगूड शहरात संतापाची लाट उसळली. ‘गुरु-शिष्य’ या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी ‘शिवभक्त’ समूह, स्थानिक पत्रकार आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. सदर नराधम मुख्याध्यापकावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी. अशा गुन्हेगारांना समाजात फिरण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून समाजात जरब बसवावी. गोरगरीब मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेण्यात यावा.

निवेदन देताना उपस्थित नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. “शिक्षकी पेशाला बदनाम करणाऱ्या अशा नराधमांना भरचौकात फटके मारले पाहिजेत,” अशी कुजबुज आणि भावना परिसरात व्यक्त होत आहे. मुरगूड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारले असून, वरिष्ठांपर्यंत ही मागणी पोहोचवून कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, विशाल कापडे, तानाजी भराडे, पंकज मेंडके, विशाल मेंडके, अभी मिटके, श्रीधर कोंडेकर, रणजीत सूर्यवंशी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या नराधम मुख्याध्यापकावर पोलीस नेमकी काय कठोर कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button