सत्तेसाठी काहीही! अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएमची ऐतिहासिक युती; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

अमरावती/अचलपूर: ‘राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो’, या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्राने अनुभवला आहे. अकोल्यातील अकोट पॅटर्ननंतर आता अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेत चक्क कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचा भाजप आणि ओवेसींच्या एमआयएम (AIMIM) या दोन परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षांनी सत्तेसाठी हातमिळवणी केली आहे. या धक्कादायक युतीमुळे अमरावतीसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अचलपूर नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या विषय समिती सभापतींच्या निवडणुकीत हे ‘अजब’ समीकरण पाहायला मिळाले. सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी भाजपने एमआयएमच्या नगरसेवकांचा पाठिंबा घेतला आहे. भाजपला सत्तेत कायम राहण्यासाठी एमआयएमचे ३ नगरसेवक, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ नगरसेवक आणि ३ अपक्ष नगरसेवकांच्या गटाने पाठिंबा दिला. या बदल्यात एमआयएमच्या नगरसेवकाला मानाचे शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद देण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच अकोल्यातील अकोट नगरपालिकेत भाजपने एमआयएमसोबत हातमिळवणी करून सत्ता काबीज केली होती. त्यावेळी भाजपवर मोठी टीका झाली होती. मात्र, टीकेची पर्वा न करता भाजपने आता अचलपूरमध्येही तोच ‘अकोट पॅटर्न’ राबवल्याचे दिसत आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी खेळल्याची चर्चा आहे. भाजप नेहमीच एमआयएमवर कट्टर धर्मांधतेचा आरोप करत टीका करत असते, तर एमआयएमकडून भाजपवर जातीयवादी असल्याची टीका केली जाते. मात्र, अचलपूरमध्ये विषय समिती सभापतींच्या निवडीवेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकमेकांच्या बाजूने मतदान केल्याने ‘सत्तेसाठी विचारधारेला तिलांजली’ दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
या युतीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. “भाजपला केवळ सत्ता हवी आहे, त्यासाठी ते कोणासोबतही जाऊ शकतात, हे आज सिद्ध झाले आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक काँग्रेस नेत्यांनी दिली आहे. दुसरीकडे, स्थानिक भाजप नेत्यांनी “शहराच्या विकासासाठी आणि स्थिरतेसाठी हा निर्णय घेतल्याचे” सांगत आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.




