सार्वजनिक बांधकाम विभाग देखरेख करतंय की झोपा काढतंय? कुर-कडगाव परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जनक्षोभ!

प्रतिनिधी: बाळासो कांबळे कूर (भुदरगड): भुदरगड तालुक्यातील कुर, कोणवडे, निळपण, दारवाड आणि मसवे महालवाडी परिसरातून पुढे कडगाव-पाटगावच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यासह, पाचवडे, बसरेवाडी, मिणचे खुर्द व मिणचे बुद्रुक या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे “प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदारांना भ्रष्टाचार नावाचा भस्म्या रोग झाला आहे का?” असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे. नागरिक टू-व्हीलर, फोर-व्हीलर असो वा मालवाहू गाड्या; रस्ते कर (Road Tax) आणि इन्शुरन्स प्रामाणिकपणे भरत आहेत. आरटीओचे दंडही वेळेवर भरले जातात. मग इतका महसूल गोळा करूनही शासन सुसज्ज रस्ते का देऊ शकत नाही? पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण केलेले रस्ते पहिल्याच पावसात वाहून जातात, यावरून कामाचा दर्जा आणि त्यातील भ्रष्टाचार स्पष्टपणे दिसून येत असल्याची भावना प्रतिनिधींशी बोलताना नागरिकांनी व्यक्त केली. स्थानिक ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य हे लोक नक्की करतात तरी काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दर एक-दीड वर्षाला या रस्त्यांची डागडुजी किंवा नूतनीकरण करावे लागते, याचाच अर्थ कामात मोठ्या प्रमाणावर घोळ आहे.
“जनतेला हवंय काय? फक्त रोटी, कपडा, मकान, पाणी आणि चालण्यायोग्य रस्ते. पण इथे तर साधे धड रस्तेही मिळत नाहीत. खेड्यातून वाट काढतच आयुष्य जाणार का?” – स्थानिक नागरिक
कोणवडे, निळपण, दारवाड आणि मिणचे परिसरात रस्त्यांवर इतके मोठे खड्डे आहेत की वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. रस्ते टिकत नसल्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खड्ड्यांमुळे पाठ-दुखी आणि मणक्यांचे आजार बळावत असून, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर स्त्रियांचे प्रचंड हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग (गारगोटी) या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. या सिस्टीममध्ये बदल होणार की नागरिकांना अशाच खडतर प्रवासाला सामोरे जावे लागणार, हे आता पहावे लागेल.कुर परिसरातील जनता आता आक्रमक झाली असून, जर तातडीने रस्ते दुरुस्ती झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे.




