पुणे-बेंगळूर महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात ट्रकच्या धडकेत पुण्यातील तरुणाचा मृत्यू!

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला): पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जय हिंद हॉटेलसमोर एका अज्ञात ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पुण्यातील एका ३३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकुल बाबासाहेब भांबरे (वय २७, रा. मोशी, पुणे) आणि त्यांचे मित्र प्रथमेश महारुद्र स्वामी (वय ३३, रा. ऋतुजा पार्क, हवेली, जि. पुणे) हे दोघे टीव्हीएस ज्युपिटर मोपेडवरून (क्रमांक: MH 09 EP 0565) चालले होते.
कणेरीवाडी फाट्या जवळ एच.पी. पेट्रोल पंपासमोरून जात असताना, पाठीमागून उजव्या बाजूने आलेल्या एका भरधाव अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीचा समतोल बिघडला आणि दोघेही खाली पडले. दुर्दैवाने, प्रथमेश स्वामी हे ट्रकच्या मागील डाव्या चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्यावरून चाक गेले, परिणामी त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडल्यानंतर ट्रक चालक तिथे न थांबता वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे. या अपघातात फिर्यादी मुकुल भांबरे यांच्या उजव्या हाताच्या कोपराला आणि पायाला दुखापत झाली असून दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास
अंमलदार: पोना ए. एल. मांडेकर,ए. के. कोरे




