महाराष्ट्र ग्रामीण

गोकुळ शिरगाव मतदारसंघात राजकीय धडाका: महिला सन्मान परिषदेच्या ‘एन्ट्री’ने बड्या नेत्यांची झोप उडाली!

गोकुळ शिरगाव: येथील पंचायत समिती मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले असून, ‘हाय अलर्ट’ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिला सन्मान परिषद पुरस्कृत आणि वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्राजक्ता रामचंद्र कांबळे यांनी रिंगणात उडी घेतल्याने प्रस्थापित सत्ताधाऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात मोठ्या नेत्यांची वाढलेली वर्दळ पाहता, येथील लढत अत्यंत अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली या भागात गेली अनेक वर्षे विविध प्रश्नांवर आंदोलने छेडण्यात आली आहेत. विशेषतः राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न परिषदेने आक्रमकपणे मांडला होता. ग्रामस्थांच्या सोबतीने केलेल्या ‘महामार्ग रोको’ आंदोलनाची दखल प्रशासनाला घ्यावी लागली आणि तिथे पादचाऱ्यांसाठी ‘अंडरपास’ मंजूर करण्यात आला. तसेच अपघात रोखण्यासाठी बॅरिकेड्स बसवण्यातही संघटनेला यश आले आहे.

लोकहिताची कामे ठरतायत कळीचा मुद्दा केवळ रस्तेच नव्हे, तर सामाजिक प्रश्नांवरही या संघटनेने आपली पकड मजबूत केली आहे:
  • स्मशानभूमी प्रश्न: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेने मोलाचे योगदान दिले.

  • व्यसनमुक्ती अभियान: गावात वाढत्या व्यसनाधीनतेविरुद्ध ‘दारूमुक्त गाव’ आंदोलनाच्या माध्यमातून महिलांची मोठी फळी उभी केली आहे.

  • मूलभूत सुविधा: विहिरीवरील धोबीघाटाचा प्रश्न असो किंवा स्थानिक नागरी समस्या, महिला सन्मान परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला आहे.

“आम्ही सत्तेत नसतानाही प्रामाणिकपणे लोकहिताची कामे केली आहेत. जर मतदारांनी आम्हाला संधी दिली, तर मतदारसंघातील सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढू. जनतेने एकदा विश्वास दाखवावा आणि प्राजक्ता कांबळे यांना विजयी करावे.” — प्रियाताई शिरगावकर (अध्यक्षा, महिला सन्मान परिषद)

महिला मतदारांमध्ये प्राजक्ता कांबळे आणि प्रियाताई शिरगावकर यांनी निर्माण केलेले स्थान पाहता, सत्ताधारी गोटात चिंतेचे वातावरण आहे. महिलांची मते फिरण्याची शक्यता ओळखून अनेक दिग्गज नेत्यांनी गोकुळ शिरगावमध्ये सभा आणि भेटीगाठींचा धडाका लावला आहे. मतपेटीतून नक्की काय कौल बाहेर पडणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button