Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण

माणुसकीला काळिमा! चिखलीत भरदिवसा गरिबाचे शौचालय जेसीबीने पाडले; प्रजासत्ताक दिनीच संविधानाचा अवमान!

चिखली (ता. कागल) | प्रतिनिधी : बाळासो कांबळे: एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार ‘स्वच्छ भारत अभियान’ यशस्वी करण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत असताना, दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली (ता. कागल) येथे एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही, कायद्याचा कोणताही धाक न बाळगता एका गरिबाच्या हक्काचे शौचालय जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मुरगूड पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

चिखली येथील दसरा चौक परिसरात अमोल बाळासो लोहार हे आपल्या कुटुंबासह राहतात. गट नंबर ५५४ मध्ये त्यांचे राहते घर आणि शौचालय आहे. त्यांचे शेजारी हरी विरपाक्ष बेनाडे हे गेल्या काही दिवसांपासून लोहार यांना त्यांचे शौचालय हटवण्यासाठी सतत धमकावत होते. २६ जानेवारी २०२६ रोजी, जेव्हा संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात मग्न होता, त्याच दिवशी सकाळी ११:०० वाजता बेनाडे यांनी जेसीबी चालक तकदीर इस्माईल किल्लेदार याला सोबत घेतले. कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा प्रशासनाची परवानगी न घेता, बेनाडे यांनी लोहार यांच्या हक्काच्या जागेतील शौचालय जेसीबीने उध्वस्त केले.

ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान अर्पण केले, त्याच दिवशी एका गरिबाच्या मूलभूत सुविधेवर घाला घालण्यात आला आहे. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची कडक आचारसंहिता लागू आहे. अशा काळात प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता भरदिवसा जेसीबी चालवण्याचे धाडस आले कोठून? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. हे कृत्य केवळ वैयक्तिक वाद नसून प्रशासकीय व्यवस्थेला दिलेले खुले आव्हान असल्याचे मानले जात आहे. पीडित अमोल लोहार यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, दोन लहान मुले आणि वयोवृद्ध आई आहे. शौचालय पाडल्यामुळे या कुटुंबाची, विशेषतः महिलांची आणि वृद्ध आईची मोठी गैरसोय होत आहे.

“माझ्या कुटुंबावर हा मोठा अन्याय झाला आहे. भरदिवसा दमदाटी करून आमचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा,” अशी आर्त मागणी अमोल लोहार यांनी केली आहे.

याप्रकरणी अमोल लोहार यांच्या तक्रारीवरून मुरगूड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२४ (४) अन्वये हरी बेनाडे यांच्यावर गुन्हा (रजि. नं. १९/२०२६) दाखल करण्यात आला आहे. सपोनि शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सरकार गरिबांना हक्काची घरे आणि शौचालये बांधून देण्यासाठी प्रोत्साहन देत असताना, अशा प्रकारे सुडबुद्धीने कृत्य करणाऱ्या प्रवृत्तींना पोलीस कायद्याचा हिसका दाखवणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल. चिखलीसह संपूर्ण कागल तालुक्याचे लक्ष आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button