गोकुळ शिरगावजवळ भीषण अपघात: बोलेरोच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर!

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला): पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगाव येथे एका भरधाव बोलेरोने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी (११ फेब्रुवारी) दुपारी ३ च्या सुमारास घडला असून, उपचारादरम्यान एकाने प्राण गमावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, करण विनय पिसाळ (२६) आणि ओंकार किशोर इंदुलकर (२७) हे दोन मित्र मंगळवारी दुपारी आपल्या सुझुकी ॲक्सेस दुचाकीवरून (क्र. MH-09 GT-2240) सर्व्हिस रोडने जात होते. यावेळी महिंद्रा शोरूमजवळ कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव महिंद्रा बोलेरोने (क्र. MH-09 CM-4480) समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने आणि अतिवेगामुळे ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ओंकार किशोर इंदुलकर (रा. कणेरी माधवनगर, ता. करवीर) याची प्रकृती खालावत गेली आणि शनिवारी (१४ फेब्रुवारी) सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जखमी अभिषेक विनय पिसाळ याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर बोलेरो चालक प्रकाश बाबूराव बोटे (४०, रा. दिंडनेर्ली, ता. करवीर) हा मदतीसाठी न थांबता गाडीसह घटनास्थळावरून पळून गेला होता. याप्रकरणी करण पिसाळ यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिस कारवाई: फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी फरार बोलेरो चालकाविरुद्ध निष्काळजीपणाने आणि अतिवेगात वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गोकुळ शिरगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे कणेरी आणि प्रतिभानगर परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील सर्व्हिस रोडवर वाढत्या वेगावर नियंत्रण मिळवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.




