मुरगूड नगरपरिषदेचा ‘कचरा’ कारभार; सूर्यवंशी-मांगोरे कॉलनीवासीयांचे आरोग्य धोक्यात!

मुरगूड (प्रतिनिधी – बाळासो कांबळे): स्वच्छतेचा मोठा गाजावाजा करणाऱ्या मुरगूड नगरपरिषदेचा खरा चेहरा आता उघडा पडला आहे. शहराच्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्याऐवजी, चक्क नगरपरिषदेचे कर्मचारीच सूर्यवंशी/मांगोरे कॉलनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत कचरा टाकत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाच्या या ‘स्वच्छता’ मोहिमेमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य मात्र टांगणीला लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषदेच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून कचरा आणून या वसाहतीच्या पाठीमागील बाजूस टाकला जात आहे. ज्या प्रशासनाने कचरा निर्मूलनासाठी पुढाकार घ्यायला हवा, तेच प्रशासन रहिवासी भागात कचरा टाकून रोगराईला निमंत्रण देत आहे. या भागात आधीच मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत, जी काढण्याची तसदी प्रशासनाने आजवर घेतलेली नाही नगरपरिषदेचे ट्रॅक्टर येथे कचरा टाकत असल्याचे पाहून आता खासगी नागरिक आणि व्यावसायिकही आपला कचरा याच ठिकाणी आणून टाकू लागले आहेत. यामुळे या सुंदर परिसराला आता अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ओला आणि सुका कचरा कुजल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या जीवघेण्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. वाढलेली झुडपे आणि साचलेला कचरा यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावरही वाढला आहे, ज्यामुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
नागरिकांचा संतप्त सवाल: “नगरपरिषद नियमित टॅक्स वसूल करते, पण सुविधांच्या नावाखाली आम्हाला फक्त कचरा आणि आजारपण देणार का? वारंवार तक्रार करूनही प्रशासन ढिम्म आहे. हा आमच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे,” असा संतप्त सवाल सूर्यवंशी/मांगोरे कॉलनीतील रहिवासी विचारत आहेत. मुरगूड नगरपरिषदेचे स्वच्छतेचे दावे फक्त कागदावरच मर्यादित असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. प्रशासन हा कचरा तातडीने उचलणार की नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.




