महाराष्ट्र ग्रामीण

मुरगूड नगरपरिषदेच्या ‘खाबूगिरी’मुळे सांस्कृतिक भवनाची दुरवस्था; संतापलेल्या नागरिकांचा आंदोलनाचा इशारा!

मुरगूड : प्रतिनिधी (बाळासो कांबळे) मुरगूड नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराचा आणि भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक नमुना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सांस्कृतिक भवनाच्या रूपाने समोर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या वास्तूची अवघ्या वर्षभरातच दुरवस्था झाली असून, प्रशासनाच्या या ‘गलथान’ कारभारामुळे दलित वस्तीतील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या सांस्कृतिक भवनाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे उघड झाले आहे. इमारतीचे बांधकाम होऊन वर्ष उलटत नाही, तोच येथील फरशा निखळून पडू लागल्या आहेत. भिंतींचा रंग उडाला असून, शेजारील शेडची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली आहे. विशेष म्हणजे, ज्या महामानवाच्या नावाने हे भवन उभे राहिले, त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भवनावर ठळकपणे लिहिण्याचे साधे सौजन्यही प्रशासनाने दाखवलेले नाही. वारंवार सूचना देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत.

शहरात अशी चर्चा रंगली आहे की, नगरपरिषदेचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यातील ‘टक्केवारी’च्या गणितामुळेच कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करण्यात आले. भवनाचे मुख्य गेट ‘हायफाय’ आणि दर्जेदार करणे अपेक्षित असताना, ते अत्यंत साध्या दर्जाचे बनवण्यात आले असून त्याला अद्याप साधा रंगही लावलेला नाही. भवनासमोरील गार्डनची अवस्थाही बिकट असून, नगरपरिषदेला फोन करून जाब विचारल्याशिवाय तिथे झाडांना पाणीही घातले जात नाही, इतकी अनास्था प्रशासन दाखवत आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेत नुकतीच मुख्याधिकारी अतिश वाळूंज यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विद्यमान नगरसेवक दत्तात्रय मंडलिक आणि राजेंद्र कांबळे उपस्थित होते. डोळ्यांदेखत निकृष्ट कामाचा पुरावा दिसत असतानाही, दोषी ठेकेदारावर अद्याप कोणतीही कडक कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नागरिकांचा इशारा: “जर ही कामे तातडीने दुरुस्त झाली नाहीत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सन्मानाने लावले गेले नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू.”

या पाहणी दरम्यान बाळासो कांबळे, अक्षय कांबळे, शहाजी कांबळे, जीवन कांबळे, तुषार कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता प्रशासन यावर काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण मुरगूड शहराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button