महाराष्ट्र ग्रामीण

​ना खातीरदारी, ना दबाव! मुरगूड नगरपरिषद आणि पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; मुख्य बाजारपेठ रस्ता अतिक्रमणमुक्त!

​मुरगूड (बाळासो कांबळे): मुरगूड शहराच्या इतिहासात आजवरची सर्वात धाडसी आणि ‘दबंग’ कारवाई पाहायला मिळाली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि वाहतुकीला अडथळा ठरणारा महात्मा गांधी मेन रोडवरील अतिक्रमणाचा विळखा नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस दलाने एका झटक्यात उखडून टाकला. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रशासनाने केलेल्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’चे संपूर्ण शहरातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.

​गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य बाजारपेठ रस्ता आणि फूटपाथवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते. मात्र नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याने अचानक मोहिमेला सुरुवात केली. यावेळी नगरपरिषदेच्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि जेसीबीच्या साह्याने नियमबाह्य असणारे पत्रे, ओटे, लोखंडी खोके आणि जाहिरात फलक उखडून काढण्यात आले. समोर कोण आहे याचा विचार न करता यंत्रणेने अवघ्या काही तासांत रस्ता पूर्णपणे चकाचक केला. ​मुरगूडच्या जनतेने आजवर अनेक मोहिमा पाहिल्या, पण आजची कारवाई विशेष ठरली. “ना कोणाची ओळख, ना कोणाची शिफारस” अशा कडक भूमिकेत अधिकारी दिसत होते. जप्त केलेले साहित्य ट्रॅक्टर ट्रॉलीमधून भरून नेण्यात आले. फूटपाथ मोकळा झाल्याने शहराने जणू मोकळा श्वास घेतला आहे. ही कारवाई केवळ नावापुरती नसून प्रशासनाचा दरारा निर्माण करणारी ठरली आहे. ​”शहराच्या विकासात अडथळा ठरणारी अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत. आजची कारवाई ही केवळ सुरुवात आहे. जेसीबी आणि आवश्यक यंत्रणेचा वापर करून उर्वरित अडथळेही दूर केले जातील.” — मुख्याधिकारी/प्रशासकीय अधिकारी, मुरगूड नगरपरिषद.
​ मुरगूड शहरामध्ये प्रत्येक चौकाचौकात नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच्या या ‘धडाक्या’ची जोरदार चर्चा सुरू असून, “अशीच शिस्त राहिली तर मुरगूडचा कायापालट नक्कीच होईल,” अशा भावना सामान्य नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button