महाराष्ट्र ग्रामीण

७ लाखांच्या लाच मागणीप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील दोघांवर गुन्हा दाखल!

कोल्हापूर: एका तक्रारदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळ तक्रारदाराच्या विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात एक अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जाच्या चौकशीदरम्यान, तक्रारदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदूम मॅडम आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल नितेश कांबळे यांनी ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. एसीबीने केलेल्या पडताळणीत असे निष्पन्न झाले की, पोलीस शिपाई एजाज महमद शेख याने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारींच्या नावाचा वापर करून ७ लाखांची मागणी केली. अखेर तडजोडीअंती ४ लाख रुपये दोन दिवसांत घेऊन येण्यास सांगितले. विशेष म्हणजे, ज्यावेळी एजाज शेख लाचेची मागणी करत होता, तेव्हा हेड कॉन्स्टेबल नितेश कांबळे तिथे हजर राहून या मागणीला प्रोत्साहन देत असल्याचे तपासात समोर आले.

एजाज महमद शेख (पोलीस शिपाई, गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे)

नितेश मारुती कांबळे (पोलीस हेड कॉन्स्टेबल, गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे)

दोन्ही आरोपींविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अर्जुन भोसले, आणि राजेंद्र सानप (पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

लोकहो, लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button