मुरगूडमध्ये पोलीस प्रशासनाकडून मुस्लिम बांधवांचे ‘गुलाब’ देऊन स्वागत!

मुरगूड (बाळासो कांबळे): पवित्र रमजान महिन्याची सांगता आज मुरगूड शहरात मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात झाली. येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे मुस्लिम बांधवांनी एकत्रित जमून ईद-उल-फितरची नमाज अदा केली. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या स्वागताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आज सकाळी नमाजानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली, ज्यामध्ये देशात शांतता, प्रगती आणि बंधुभाव टिकून राहावा यासाठी विशेष ‘दुवा’ मागण्यात आली. एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा देत असतानाच, मुरगूड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) शिवाजी करे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहून सर्वांचे स्वागत केले.

सपोनि करे यांनी स्वतः प्रत्येक मुस्लिम बांधवाला गुलाबाचे फूल देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलिसांच्या या संवेदनशील आणि आपुलकीच्या भूमिकेमुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मुस्लीम बांधवांनीही पोलीस प्रशासनाचे आभार मानत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. “सण कोणताही असो, पोलीस नेहमीच आमच्या सुरक्षेसाठी सज्ज असतात, आज त्यांनी दिलेली ही गुलाबाची भेट आमच्यासाठी मोलाची आहे,” अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. या प्रसंगी पोलीस कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. या उपक्रमामुळे मुरगूड शहरात जातीय सलोखा अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले.




