महाराष्ट्र ग्रामीण

मुरगूड बस स्थानकात ‘नरकयातना’; उघड्यावरील ड्रेनेजमुळे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ!नागरिक हैराण; पावसाळ्यात परिस्थिती भीषण होण्याची भीती,

मुरगूड: (​प्रतिनिधी : बाळासो कांबळे): मुरगूड येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानक परिसरात बांधलेल्या शौचालयाचे ड्रेनेज थेट उघड्यावर सोडण्यात आल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे, जिथे शौचालय बांधले आहे तिथे सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटाराची कोणतीही सोय नसल्याने हे दूषित पाणी थेट जमिनीवर पसरत आहे. वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही परिवहन महामंडळाचे अधिकारी ‘कुंभकर्णी’ झोपेत असल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना नरकयातना सोसाव्या लागत आहेत.

​मुरगूड बस स्थानक हे तालुक्यातील ५० ते ६० गावांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. येथून दररोज हजारो विद्यार्थी शाळा-महाविद्यालयासाठी ये-जा करतात. बस स्थानकाला लागूनच पाटील कॉलनीकडे जाणारा मुख्य रस्ता आहे, जिथे नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्यावर पसरलेल्या या ड्रेनेजच्या पाण्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आणि रहिवाशांना नाक मुठीत धरून घाणीतूनच वाट काढावी लागत आहे.
​बस स्थानकाच्या अगदी शेजारी ग्रामीण रुग्णालय आहे, जिथे ५०-६० गावांतील रुग्ण उपचारासाठी येतात. स्थानकाच्या समोरच वाचनालय, नगरपरिषद, पोस्ट ऑफिस आणि शाळा आहे. अत्यंत गजबजलेल्या आणि संवेदनशील भागात अशा प्रकारे उघड्यावर ड्रेनेज वाहणे, हे सार्वजनिक आरोग्यासाठी मोठे संकट ठरत आहे. बस स्थानकातील गाळेधारक आणि व्यापारी या दुर्गंधीमुळे त्रस्त झाले असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.


​सध्या उन्हाळ्यात ही परिस्थिती असताना, पावसाळ्यात हे पूर्ण ड्रेनेज परिसरात पसरते. यामुळे कॉलरा, टायफॉइड सारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. महामंडळाला वारंवार सांगूनही ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. प्रशासन एखाद्या मोठ्या अनर्थाची किंवा साथीच्या रोगाची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
​नागरीकांच्या प्रमुख मागण्या: (१) ​शौचालयाचे ड्रेनेज तातडीने बंदिस्त करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी गटार व्यवस्था करावी. (२) ​बस स्थानक परिसरातील साचलेल्या घाणीची तातडीने स्वच्छता करावी. (३) ​कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.
​जर परिवहन महामंडळाने तातडीने हालचाल केली नाही, तर जागृत मालक फाउंडेशन, कोल्हापूर टाईम्स आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षाच्या वतीने पाठपुरावा करून स्वच्छता करण्यात आली होती पण अजून ही परीस्थिती जैसे थे असल्याने मुरगूडवासीय आणि प्रवाशांच्या वतीने आक्रमक पाऊल उचलले जाईल, असा इशारा देण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button