मुरगूड ग्रामीण रुग्णालयाचा कारभार ‘वाऱ्यावर’; डॉक्टर निवासाकडे फिरकेनात, इमारतीचे झाले ‘कबाडखाना’!
शासकीय निधीची उधळपट्टी : लाखोची इमारत वापराविना धूळखात, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

मुरगूड (प्रतिनिधी : बाळासो कांबळे): सामान्य जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून लाखो रुपये खर्च करून मुरगूड येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, याच रुग्णालयातील डॉक्टरांसाठी बांधलेली निवासस्थाने आज प्रशासकीय अनास्थेमुळे ‘कबाडखाना’ बनली आहेत. एकीकडे आरोग्य सुविधेचा बोजवारा उडालेला असताना, दुसरीकडे सुसज्ज इमारती वापराविना पडून राहिल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुरगूड आणि परिसरातील अनेक गावांसाठी हे रुग्णालय आधारवड आहे. येथे नियुक्त असलेल्या डॉक्टरांना तातडीने सेवा देता यावी, यासाठी रुग्णालयाच्या आवारातच निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतींकडे कोणीही फिरकलेले नाही. डॉक्टर स्वतः या निवासस्थानी राहण्यास तयार नसल्याने लाखो रुपये खर्चून बांधलेली ही वास्तू आता भंगार साहित्याचे कोठार बनली आहे.

गोरगरीब जनतेच्या रक्ताघामाचा पैसा वापरून या इमारती उभ्या केल्या गेल्या. जर डॉक्टरांना या ठिकाणी राहायचेच नसेल, तर मग इतका मोठा खर्च कशासाठी केला? असा जळजळीत सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. या इमारती वापरात नसल्याने तिथे आता झाडे-झुडपे वाढली असून, त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनण्याची भीती निर्माण झाली आहे. ”सरकारी मालमत्तेची अशी दैना होणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. डॉक्टरांनी मुख्यालयी राहून सेवा देणे अपेक्षित असताना इमारतीला कबाडखान्याचे स्वरूप येणे म्हणजे शासकीय निधीचा अपव्यय आहे. यावर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.” — संतप्त नागरिक, मुरगूड.
आरोग्य विभागाने या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या इमारतींची दुरुस्ती करून त्या निवासयोग्य केल्या जाणार की त्या पूर्णपणे निकामी होईपर्यंत प्रशासन ‘कुंभकर्णी’ झोप घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने तात्काळ या इमारतीची स्वच्छता करून, तेथील भंगार साहित्य हटवावे आणि डॉक्टरांना तिथे राहण्यास भाग पाडावे, जेणेकरून ग्रामीण भागातील रुग्णांना २४ तास सेवा उपलब्ध होईल, अशी मागणी जोर धरत आहे.




