Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण

मुरगूड नगरपरिषदेचा ‘अंधाधुंद’ कारभार! खासगी जागेत घुसखोरी करून विना भूसंपादन गटर बांधकाम; RTI मध्ये फुटलं बिंग!

मुरगूड (प्रतिनिधी : बाळासो कांबळे): मुरगूड नगरपरिषदेचा कारभार सध्या कमालीचा चर्चेत आला असून, रावण गल्ली परिसरात चक्क खासगी मालकीच्या जागेत कोणत्याही प्रकारचे भूसंपादन न करता बेकायदेशीरपणे गटरीचे बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकारात (RTI) मागवलेल्या माहितीनंतर नगरपरिषेदेच्या या ‘भोंगळ’ कारभाराचे वाभाडे निघाले असून, प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रावण गल्लीच्या मागील बाजूस असलेल्या एका खासगी मालकीच्या जागेत नगरपरिषदेने अलीकडेच गटरीचे बांधकाम केले. वास्तविक, कोणत्याही खासpगी जागेत सरकारी काम करताना संबंधित जागेचे कायदेशीर भूसंपादन करणे किंवा मालकाची लेखी संमती घेणे बंधनकारक असते. मात्र, मुरगूड नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने या नियमांना हरताळ फासत, चक्क मालकाला अंधारात ठेवून या जागेवर घुसखोरी करत बांधकाम उरकून घेतले.

​ या बांधकामाबाबत संशय आल्याने माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवण्यात आली होती. यामध्ये नगरपरिषदेने सदर जागेचे कोणतेही भूसंपादन केले नसल्याचे आणि या कामासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबवली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खासगी मालमत्तेवर प्रशासनाने असा ‘डल्ला’ मारल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. ​ एकीकडे विकासकामांचा गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे कायद्याची पायमल्ली करून खासगी मालमत्तेवर अतिक्रमण करायचे, असा दुटप्पी धोरण पालिकेने अवलंबल्याचे दिसत आहे. विना भूसंपादन सरकारी निधी खर्च करून खासगी जागेत बांधकाम करणे हा गंभीर गुन्हा असून, यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कारवाई होणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मुख्य मुद्दे: नियम धाब्यावर:

(१) भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया न राबवता थेट बांधकाम. ​जागा मालकाची फसवणूक:

(२) मालकाची कोणतीही लेखी परवानगी नाही. ​निधीचा गैरवापर:

(३) बेकायदेशीर कामासाठी सरकारी तिजोरीतून खर्च. ​आर.टी.आय.चा दणका:

(४) माहिती अधिकारामुळे नगरपरिषदेचा खोटा कारभार जनतेसमोर.

​”ज्या जागेवर नगरपरिषदेने हक्क गाजवत गटर बांधली, ती जागा कागदोपत्री खासगी असताना नगरपरिषदेने तिथे बांधकाम करण्याचे धाडस कसे केले? हा सरळ सरळ सत्तेचा आणि पदाचा दुरुपयोग आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधित दोषींवर कडक कारवाई व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.” — (श्री. सुहास पांडुरंग दरेकर )
​आता या प्रकरणावर मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काय स्पष्टीकरण देतात आणि या बेकायदेशीर बांधकामावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button