संतोष गायकवाड यांची इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कागल तालुका सहअध्यक्षपदी निवड
विश्वकर्मा युनियनच्या माध्यमातून केलेल्या कार्याची पावती; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

कागल: (प्रतिनिधी, बाळासो कांबळे): महाराष्ट्र शासनाच्या ‘इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’च्या कागल तालुका कमिटीमध्ये सहअध्यक्ष म्हणून विश्वकर्मा बांधकाम कामगार युनियनचे सर्वेसर्वा संतोष गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल बांधकाम कामगार क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संतोष गायकवाड यांनी विश्वकर्मा बांधकाम कामगार युनियनच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांत संघटनात्मक जाळे विणले आहे. ऊन-पावसाची तमा न बाळगता, अहोरात्र कष्ट करून त्यांनी अनेक गरजू कामगारांना, माता-भगिनींना आणि कामगारांच्या पाल्यांना शालेय शिक्षणाचे तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून दिले आहेत.
एका सर्वसामान्य कुटुंबातून जिद्दीच्या जोरावर उंच भरारी घेणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी संघटनेत विविध पदे भूषवली असून, आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी ‘सर्वसामान्यांचा नेता’ म्हणून जनमानसात स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेऊन आता त्यांची शासकीय कमिटीवर निवड करण्यात आली आहे.

या निवडीमुळे विश्वकर्मा युनियनच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. त्यांच्या निवडीमुळे कागल तालुक्यातील बांधकाम कामगारांचे प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




