Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण

मुरगूड पोलीस ठाण्याचा कारभार ‘क्रांती’च्या हाती; पदभार स्वीकारताच अवैध गर्भपाताचा पर्दाफाश!

​धडाकेबाज अधिकारी क्रांती पाटील यांच्या एन्ट्रीने गुन्हेगारांचे धाबे दणाणले; छेडछाड आणि अमली पदार्थांविरोधात विशेष मोहिमेचे संकेत

​मुरगूड (​प्रतिनिधी : बाळासो कांबळे): मुरगूड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी (API) क्रांती पाटील यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीमुळे मुरगूडला दुसऱ्या महिला अधिकारी मिळाल्या आहेत. मागील दोन वर्षे सेवा बजावलेले सपोनी शिवाजी करे यांची करवीर पोलीस ठाण्यात बदली झाल्याने ही जबाबदारी पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्याबद्दल क्रांती पाटील यांना ‘भारताचे संविधान’ हे पुस्तक भेट देऊन त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले.


​क्रांती पाटील यांनी पदभार स्वीकारल्याबरोबर आपली ‘धडाकेबाज’ ओळख सिद्ध केली आहे. बिद्री येथील एका दवाखान्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणाचा त्यांनी छडा लावला. या कारवाईत डॉक्टरसह एजंट टोळीला जेरबंद करून त्यांनी गुन्हेगारी जगताला स्पष्ट इशारा दिला आहे. ​मूळच्या कोल्हापूरच्या असणाऱ्या क्रांती पाटील यांनी स्पर्धा परीक्षेद्वारे पोलीस दलात प्रवेश केला. त्यांच्या नावावर उल्लेखनीय कामगिरीची नोंद आहे. (१) ​ठाणे जिल्हा: ८ वर्षे पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून कार्य. (२) ​रायगड जिल्हा: ४ वर्षे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून प्रभावी काम. (३) ​शाहूपुरी (कोल्हापूर): निर्भया पथकाचे नेतृत्व करत मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर वचक निर्माण केला. (४) ​इस्पुर्ली: मुरगूडला येण्यापूर्वी त्या इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी होत्या.
​”शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन मुलींची छेडछाड आणि बालविवाहासारख्या प्रथांविरुद्ध मुला-मुलींचे प्रबोधन करणे ही आपली प्राथमिकता असेल,” असे क्रांती पाटील यांनी स्पष्ट केले.
​यावेळी पत्रकार बाळासो कांबळे आणि पत्रकार सिकंदर जमादार यांनी पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी मुरगूड परिसरातील वाढते गांजाचे व्यसन, मटका आणि अवैध धंदे तसेच बाजारपेठेतील अतिक्रमण आणि पार्किंगची समस्या यांसारख्या ज्वलंत प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. या सर्व समस्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
​याप्रसंगी ‘जागृत मालक फाउंडेशन’चे जिल्हा उपाध्यक्ष- सुहास दरेकर, प्रल्हाद कांबळे, रुस्तमखान जमादार, मधुकर शिंगे, राहुल मिठारी तसेच ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'( आठवले ) पक्षाचे अजित कांबळे, वैभव कांबळे, संकेत कालमणकर, सुनील गवळी आदी उपस्थित होते.

​”मुरगूडची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अवैध धंदे चालवणाऱ्यांची गय केली जाणार नाही.” — क्रांती पाटील (API, मुरगूड).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button