महाराष्ट्र ग्रामीण

कागल महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीची बोलेरोला धडक, एकाचा मृत्यू

कागल (बाळासो कांबळे): पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कागल येथील ‘हुच्चे मळा’ परिसरात रविवारी सकाळी ९ च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. चुकीच्या (विरुद्ध) दिशेने वेगात आलेल्या दुचाकीने बोलेरो जीपला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, बोलेरोमधील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील बरसगाव दुमाला येथील दत्ता भरत शिंदे (वय ४२) हे आपल्या कुटुंबासह आणि नातेवाईकांसह बोलेरो गाडीतून (क्रमांक उपलब्ध नाही) आदमापूर येथील बाळूमामांचे दर्शन घेऊन परतत होते. बोलेरो कागल येथील हुच्चे मळ्याजवळ आली असता, समोरून चुकीच्या दिशेने अतिवेगात येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने बोलेरोला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बोलेरो महामार्गाच्या कडेला असलेल्या सखल भागात जाऊन पलटी झाली. दुचाकीस्वारही रस्त्याच्या कडेला फेकला गेला. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून बोलेरोचेही मोठे नुकसान झाले आहे.

मृताची आणि जखमींची माहिती मृत व्यक्ती: दादासो महादेव सोनुले (वय ४४, रा. वंदूर, ता. कागल) – दुचाकीस्वार. गंभीर जखमी: दत्ता भरत शिंदे, मनीषा आगळे आणि मानवी आगळे (बोलेरोमधील प्रवासी).

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. सर्व जखमींना तातडीने कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुचाकीस्वार दादासो सोनुले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बोलेरोमधील जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी दत्ता शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कागल पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दुचाकीस्वाराने चुकीच्या दिशेने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

महत्वाची सूचना: महामार्गावर वेळ वाचवण्यासाठी चुकीच्या दिशेने वाहन चालवणे जीवावर बेतू शकते. कृपया वाहतुकीच्या नियमांचे पालन करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button