महाराष्ट्र ग्रामीण

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीचा ‘बुलडोझर’; रेमंड चौकासह परिसरातील ६० टपऱ्या जमीनदोस्त

​कागल : (इरफान मुल्ला) कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील वाढत्या अतिक्रमणाविरोधात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) अखेर कडक पाऊल उचलले आहे. वसाहतीमधील मुख्य रस्ते आणि रेमंड चौक परिसरात राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत सुमारे ६० टपऱ्या, खाऊ गल्लीतील नाष्ट्याच्या गाड्या आणि अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. दिवसभर चाललेल्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. ​गेल्या अनेक दिवसांपासून औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच वसाहतीच्या नियोजित आराखड्याला बाधा येत होती. याची दखल घेत प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेत केवळ टपऱ्याच नव्हे, तर पाच ते सहा कारखान्यांचे अनधिकृतपणे उभारलेले पार्किंग शेड आणि एक एटीएम केबिनदेखील हटवण्यात आली.


​एमआयडीसीचे पथक आणि पोलीस ताफा दाखल होताच परिसरातील वातावरण तापले होते. मात्र, प्रशासनाचा आक्रमक पवित्रा पाहून काही खोकी धारकांनी स्वतःहून आपली खोकी आणि साहित्य काढून घेण्यास सुरुवात केली. रेमंड चौक परिसरातून या मोहिमेला सुरुवात झाली आणि ती दिवसभर सुरू होती. औद्योगिक वसाहतीचा श्वास मोकळा करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या कारवाईमुळे वसाहतीमधील मुख्य रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला असून, यापुढे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन एमआयडीसी प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button